| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑगस्ट २०२४
विशाल पाटील विश्वजीत कदम चंद्रहार पाटील ही तरुण मुलं आहेत. चंद्रहार पाटील पडले त्याचा दुःख आहेच, पण तिथे भाजप जिंकला नाही याचा अधिक आनंद आहे, असे सांगत उबाठा शिवसेनाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी जे घडायला नको होतं ते झालं, अशी प्रांजळ कबुलीही दिली. उद्धव ठाकरे हे सध्या नवी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक विषयावर भाष्य केले आहे. यामध्ये सांगली लोकसभा निवडणूक निकालाबद्दल ही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
देशभरात नुकतीच पार पडलेली निवडणूक अनेक कारणाने गाजली. परंतु या निवडणुकी दरम्यान सर्वात मोठा मुद्दा गाजला तो विशाल पाटील यांच्या उमेदवारीचा. उद्धव ठाकरे यांनी मिरज येथील जाहीर सभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी टाळ्यांच्या आणि जयघोषाच्या गजरात जाहीर केली. पुढे जे काही घडलं ते सर्वज्ञात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट म्हणजे, 'झालं गेलं विसरून, नव्याने एकत्र येऊन भाजपा विरुद्ध लढू या !' अशी पॅचअपची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उबाठा गटाने वरिष्ठ पातळीवर जिल्ह्यात दोन मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. मात्र सांगलीतील स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने, येथे वादाची ठिणगी पडू नये, आणि त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी कदम-पाटील यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटप, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते लवकरच घेणार असून, 'जेथे ज्यांची शक्ती जास्त तेथे उमेदवार' हा फंडा वापरला जाणार असल्याची माहिती सुत्राकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा 'सांगली लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती' होऊ नये, यासाठी प्रत्येक पक्षाने खबरदारी घेण्याचेही ठरवले असल्याची माहिती आहे. सध्या महायुतीबद्दल जनतेत रोष असून त्याचा फायदा महाविकास आघाडीला घ्यायचा असेल तर आपापसातील मतभेद बाजूला ठेवण्याची गरज असल्याचे, वरिष्ठ नेत्यांचे मनाने आहे.