Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्ह्यात विधानसभेसाठी 24 लाख 54 हजार मतदारांसाठी 2,482 मतदान केंद्रे !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑगस्ट २०२४
निवडणूक आयोगाने ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याचे संकेत दिले असल्याने प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या तयारीसाठी धावपळ सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदार यादी अंतिम करणे, मतदान केंद्रांची संख्या आणि तयारीसाठी नियोजन, मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप यादी तयार करणे असा कार्यक्रम आखला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सदर मतदार यादी मध्ये आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, आणि जर नाव समाविष्ट नसेल तर योग्य तो फॉर्म भरून आपले नाव समाविष्ट करावे असे आवाहन केले आहे. 

जिल्हा प्रशासनाने प्रारूप मतदार यादी जाहीर केले असून त्यामध्ये 24 लाख 54 हजार 377 मतदारांची नावे समाविष्ट आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा ही संख्या 20,260 ने अधिक आहे. या यादीनुसार पुरुष मतदारांची संख्या 12 लाख 50 हजार 756 तर स्त्री मतदारांची संख्या 12 लाख 3 हजार 487 इतकी आहे मतदार यादीत तृतीय पंथीयांची 134 इतकी संख्या आहे.


ही मतदार यादी सर्व मतदान केंद्रे, तहसील आणि प्रांत कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध असून ज्या मतदारांच्या नावात बदल करावयाचा आहे तसेच नव्याने नाव नोंदणी करायची आहे त्यांनी योग्य तो फॉर्म भरून प्रशासनाकडे द्यावा असे आवाहन डॉ. दयानिधी यांनी केले आहे.

दरम्यान गत विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जिल्ह्यातील मतदान केंद्राची संख्या ही वाढली आहे मतदारांना सोयीस्कर होईल असे नियोजन करताना 50 मतदान केंद्राच्या नावात बदल, 137 केंद्रांच्या ठिकाणात बदल करीत 99 केंद्राचे एकत्रीकरण करण्यात आले असून 61 नवीन केंद्रामुळे आता हे मतदान केंद्राची संख्या 2,482 झाली आहे. यामध्ये मिरज मतदार संघ 307, सांगली मतदारसंघ 315, इस्लामपूर मतदारसंघ 290, शिराळा मतदारसंघ 334, पलूस कडेगाव मतदार संघ 285, खानापूर मतदारसंघ 356, तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघात 308 तर जत मतदार संघात 287 मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असल्याची माहिती ही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली आहे.