Sangli Samachar

The Janshakti News

शिरोळ तालुक्यातील पीक नुकसानीस जिल्हा प्रशासन जबाबदार - विजयकुमार दिवाण


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
यावर्षी 2024 मध्ये आलेल्या महापुराने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात शेतीचे किती अतोनात नुकसान केले आहे, हे सोबतच्या व्हिडिओवरून आपल्या लक्षात येते. 

ह्या नुकसानीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि तेथील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत,अशी टीका कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील,जलाभ्यासक निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, जल अभ्यासक निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी पत्रकारांबरोबर बोलताना केली.

शेती पिक नुकसानीचा व्हिडिओ 

दिवाण म्हणाले, कृष्णा खोऱ्यातील महापुराच्या संकटाबद्दल आम्ही कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, सांगलीचे जिल्हाधिकारी तसेच कोल्हापूर आणि सांगली येथील जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना वारंवार इशारा देऊन जागे करत होतो. अलमट्टी धरण आणि त्या शेजारचा हिप्परगी बंधारा यामध्ये अतिरिक्त आणि बेकायदेशीर नियमबाह्य पाणीसाठा केल्यामुळेच महापूर येतो हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आम्ही कानीकपाळी ओरडून सांगत होतो. परंतु कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याकडे बिलकुल लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम म्हणजे शिरोळ तालुक्यात महापुराचे संकट आले. त्यामध्ये शेतीचे अतोनात नुकसान झाले.


ऊस हे पीक कितीही पाण्याला टक्कर देणारे असते. परंतु अनेक दिवस हे पीक पाण्यात राहिल्यामुळे ते बाद झाले आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कोण देणार ? असा सवाल करून दिवाण म्हणाले, शासनाने तातडीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी भरीव नुकसान भरपाई द्यावी. कारण हे नुकसान कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या बेफिकीर वृत्तीमुळे झाले आहे. त्यामुळे शासनाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे ही जबाबदारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. कोल्हापूर जिल्ह्यातील यावर्षीचा महापूर हा मानवनिर्मित नव्हे; तर शासननिर्मित आहे त्यामुळे शासनाने तातडीने भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे.