Sangli Samachar

The Janshakti News

जयश्रीताई पाटील यांचा 'स्त्री हट्ट' सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेससाठी घातक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑगस्ट २०२४
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगलीत लोकसभेच्या पुनरावृत्तीसाठी उभ्या ठाकल्या आहेत. परंतु त्यांचा हा 'स्त्री हट्ट' काँग्रेससाठी घातक ठरणार असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. 'गतवेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण काँग्रेस श्रेष्ठींच्या आवाहनाला मान देत माघार घेतली. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माघार न घेता निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचा ठाम निर्धार जयश्रीताई पाटील यांनी केला आहे.

सांगली महापालिका तसेच विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात स्व. मदनभाऊ पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या पश्चात या वर्गाला बळ देण्याचे काम जयश्री ताईंनी केले आहे. सांगली महापालिकेत जयश्रीताईंना मानणारा नगरसेवकांचा मोठा गट आहे. विधानसभा मतदारसंघातील अनेक ग्रामपंचायतीवर मदन भाऊ गट सत्तेवर आहे. आणि हीच जयश्रीताईंची ताकद आहे. याच ताकदीच्या जोरावर त्यांनी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी केली आहे. याच गटामुळे सांगली विधानसभा मतदार संघामध्ये, लोकसभेला विशालदादांना मताधिक्य मिळाले.

जयश्रीताई पाटील यांनी आपल्या काही समर्थकांसह मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन, सांगली विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी योग्य तो निर्णय घेऊ, असे म्हटल्याचे जयश्रीताईंनी सांगली पत्रकारांना सांगितले. यावेळी बोलताना जयश्रीताई म्हणाल्या की, काँग्रेसने आपणास उमेदवारी दिली नाही तर आपण स्व. मदनभाऊ आणि खा. विशालदादा यांच्याप्रमाणे बंडखोरी करीत इतिहास घडवू. परंतु आता माघार नाही.


मात्र स्व. मदन भाऊ पाटील अथवा खा. विशालदादा पाटील यांनी ज्याप्रमाणे बंडखोरी करीत निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता, ती परिस्थिती जयश्रीताई पाटील यांच्या बाबतीत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. स्व. मदनभाऊ पाटील यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून कुचंबना केली जात होती. निवडणुकीत षडयंत्र करून त्यांना पराभूत केले जात होते. याचा राग दादा प्रेमी मतदारांनी मतदान यंत्राद्वारे दाखवून दिला आणि स्व. मदनभाऊंना स्वाभिमानाने विधानसभेत पाठवले.

गतवेळच्या आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना रोखण्यासाठी अनेक उचापती केल्या. उद्धव ठाकरे यांनी तर या सर्वावर कडी करीत, महाआघाडीच्या नेत्यांना अंधारात ठेवून, पै. चंद्रहार पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले. याचा राग आणि सहानुभूती विशाल पाटील यांना मिळाली आणि त्यांनी मोठा विजय संपादन केला.

विशाल दादा पाटील हे काँग्रेसच्या नव्हे तर महाआघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारा विरोधात निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र जयश्रीताई पाटील यांना स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवावी लागणार आहे. खा. विशालदादा पाटील यांनी ज्याप्रमाणे लोकसभेत मतदार संघातील अडचणीबाबत आवाज बुलंद केला, मात्र जयश्रीताईंचा मवाळ स्वभाव विधानसभेत सांगली विधानसभा मतदार संघातील अडचणी विरोधात आवाज उठवण्यासाठी कमी पडेल की काय अशी शंका व्यक्त होत आहे.


या पार्श्वभूमीवर काँग्रेसतर्फे पुन्हा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पृथ्वीराजबाबा पाटील यांची बाजू उजवी आहे. गेली पाच वर्ष ते गतवेळच्या निवडणुकीतील पराभव विसरून, मोठ्या ताकतीने ते कार्यरत आहेत. मतदार संघातील अनेक समस्येबाबत त्यांनी जोरदार आंदोलने केली आहेत. खा. विशाल दादा पाटील आणि आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या बरोबरीने त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवाज बुलंद केला आहे.

2019 चा असो किंवा नुकताच आलेला 2024 चा महापूर. नागरिकांच्या मदतीसाठी पहिल्यांदा धावून गेले ते पृथ्वीराजबाबा पाटील. कोरोना काळात त्यांनी केलेले मदत कार्य कोणीही विसरू शकत नाही. येथील हिंदू कार्ड आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले आहेत. गेल्या दोन महिन्यात पृथ्वीराज बाबांनी हाती घेतलेली आंदोलने मतदारांच्या मनात त्यांच्याबाबत आदर निर्माण करणारी आहेत. एक आश्वासक चेहरा म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहतो आहे. आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी पृथ्वीराज पाटील यांना निवडून आणण्याचा शब्द दिला आहे. आणि त्यांनी दिलेला शब्द यशस्वी करण्याची जिगर डॉ. कदम यांच्यात आहे. 

स्वतः पृथ्वीराजबाबा पाटील यांनी अनेक संघटना, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील प्रमुखांना भेटून त्यांचे पाठबळ मिळवलेले आहे ही मोठी जमेची बाजू आहे. आणि म्हणूनच त्यांचे पारडे जयश्रीताईंपेक्षा जड आहे. ही बाब काँग्रेस पक्षश्रेष्ठी निश्चित विचारात घेतील. 

मात्र जयश्रीताई यांचा 'स्त्री हट्ट' त्यांच्या स्वतःसाठी व काँग्रेस पक्षासाठी घातक ठरणार असल्याची उघड उघड चर्चा, मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह मतदारात होत आहे. आता काँग्रेस श्रेष्ठी त्यांची समजूत कशी घालतात, यावरच आगामी विधानसभा निवडणूक सांगली मतदार संघात काँग्रेससाठी जमेची ठरणार की वजाबाकी हे येणारा काळच ठरवेल.