Sangli Samachar

The Janshakti News

'अब की बार, मागण्यांचा भडीमार'; शिंदे, पासवान, चंद्राबाबू यांच्या नव्या डिमांड काय ?


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ६ जून २०२४
लोकसभा निवडणूक निकालानंतर देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान म्हणून मोदी तिसऱ्यांदा 8 जून रोजी शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, 'अब की बार, 400 पार' या दिलेल्या घोषणेचा आकडा काही एनडीएला पार करता आलेला नाही. भाजप आणि एनडीएला मिळून 292 जागा मिळाल्या आहेत. त्यातील भाजपच्या जागा 240 आहेत. या निवडणुकीत भाजपला एकहाती यश मिळाले नाही. त्यामुळेच एनडीएमधील घटकपक्षांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळे भाजपची अवस्था आता ‘अब की बार, मागण्यांचा भडीमार’ अशी झाली आहे.

एनडीएचे घटकपक्ष टीडीपी, जेडीयू, लोक जनशक्ती पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी भाजपसमोर आपल्या मागण्या मांडण्यास सुरवात केली आहे. यातील सर्वात मोठी आणि महत्वाची मागणी लोकसभा अध्यक्षपदाची आहे. लोकसभेत 16 जागा मिळविणाऱ्या टीडीपी पक्षाने लोकसभा अध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. त्याचसोबत जेडीयू, शिवसेना (शिंदे गट) आणि चिराग पासवान यांनीही महत्त्वाची मंत्रिपदे मागितली आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या सरकारबाबत गदारोळ सुरू झाला आहे. मोदी सरकारची आज अखेरची मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यानंतर पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडे सादर केला. तर, संध्याकाळी भाजप नेतृत्वाखालील एनडीएची दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. मात्र, या बैठकीपूर्वी आणि सरकार स्थापनेपूर्वी एनडीएच्या मित्रपक्षांनी भाजपवर दबाव आणण्यास सुरुवात केल्याची बातमी समोर येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेडीयूने 3 कॅबिनेट मंत्र्यांची मागणी केली आहे. याशिवाय शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनाही 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदाची मागणी केल्याची माहिती आहे. तर, चिराग पासवान हे ही 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाची मागणी करू शकतात. जीतन राम माझी यांनाही मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय.

चंद्राबाबू यांच्या काय आहेत मागण्या?

चंद्राबाबू नायडू यांनीही 5 ते 6 किंवा त्याहून अधिक मंत्रिपदे मागू शकतात, अशी माहिती आहे. देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेत ऐतिहासिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्या राज्याला अशा राज्यांना विशेष दर्जा दिला जातो. राष्ट्रीय विकास परिषदेने (NDC) तसा निर्णय घेतला आहे. तेलंगणा वेगळे झाले आणि हैदराबाद तेलंगणात गेले. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असा त्यांचा युक्तिवाद करत चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी करत आहेत. ही जुनी मागणी ते पुढे करू शकतात.

एनडीएचे 5 मोठे मित्रपक्ष आणि पक्षाच्या जागांची संख्या

1. तेलगु देसम पार्टी ( TDP ) – 16
2. जनता दल ( JDU ) – 12
3. शिवसेना ( शिंदे गट ) – 7
4. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) – 5
5. जनता दल ( जेडीएस ) – 2

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने 292 जागा जिंकल्या, तर विरोधी इंडिया आघाडी 234 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने 240 जागा जिंकल्या जे बहुमताच्या 272 पेक्षा कमी आहे. तर काँग्रेसला 99 जागा जिंकण्यात यश आले. 2019 च्या 52 जागांपेक्षा 47 जागा जास्त आहे. एनडीएच्या मतांची टक्केवारीही यावेळी कमी झाली आहे.

टीडीपी करू शकते या मंत्रालयाची मागणी

1. लोकसभा अध्यक्ष पद
2. रस्ते वाहतूक
3. ग्रामीण विकास
4. आरोग्य
5. गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार
6. शेती
7. माहिती आणि प्रसारण
8. शिक्षण
9. वित्त ( अर्थ )