Sangli Samachar

The Janshakti News

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारण्याची शक्यता ? भाजपाचा प्लॅन बी काय ?| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ जून २०२४
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला. आता काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात मराठा सामाजाचा प्रभाव आणि मोठी लोकसंख्या गृहीत धरून आता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व विनोद तावडे यांना पुन्हा महाराष्ट्रात परत पाठवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा मिळवणाऱ्या भाजपला आता केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ मोदी यांचा केंद्रातील राजकारणात उदय होण्याच्या पूर्वीच्या म्हणजे २००९ च्या स्थितीला पक्ष पुन्हा येऊन पोहोचला आहे. एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाची नाराजी आणि दुसरीकडे आपला चाळीस वर्षांपूर्वीचा माधवं ( माळी, धनगर, वंजारी ) फॉर्म्युलाही पक्षाला राखता आलेला नाही.

या समीकरणाचा भक्कम आधार राहीलेले गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पंकजा यांचे निकटवर्तीय नेते महादेव जानकर यांचाही फारसा लाभ भाजपला करून घेता आला नाही. जानकर धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
आता विधानसभा निवडणुका लवकरच होतील. पक्षसंघटनेच्या बांधणीसाठी उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळे करण्याची इच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. पूर्णपणे निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा त्यांचा मानस आहे.

तथापि, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनाच महाराष्ट्रातून सगळ्यांत जास्त विरोध झाला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या पक्षांतील फुटींसाठी त्यांच्यावरच रोष आहे. या कारणांचा भाजपला फटका बसला आहे. ज्या क्षेत्रातून फडणवीस येतात त्या विदर्भातून भाजपला दोनच जागा मिळाल्या आहेत. त्यातलीही एक नितीन गडकरी हे स्वत:च्या कामामुळे जिंकले आहेत. नामशेष होत चाललेल्या कॉंग्रेस पक्षसंघटनेला विदर्भानेच संजिवनी देण्याचे काम केले आहे.

या सगळ्या घटनाक्रमाच्या पाश्‍र्वभूमीवर राज्यात भाजपला पुन्हा सुस्थितीत आणायचे असेल तर नवा चेहरा द्यावा लागेल या निष्कर्षाप्रत भाजपश्रेष्ठी पोहोचले आहेत. हा चेहरा म्हणून राज्यातूनच केंद्रात गेलेले विनोद तावडे यांना पहिली पसंती दर्शवली जाते आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर केंद्रात सरचिटणीस पद भूषवणारे विनोद तावडे हे राज्यातील दुसरे नेते आहेत.

गेल्या काही काळात बिहार आणि हरियाणा या राज्यांत प्रभारी म्हणून काम करून त्यांनी त्यांची उपयुक्तता सिध्द केली आहे. महाजन आणि मुंडे या बड्या नेत्यांसोबत त्यांनी काम केले आहे व विशेष म्हणजे ते स्वत: मराठा समाजातून येतात. सध्या भाजपला याचीच सगळ्यांत जास्त गरज आहे.