Sangli Samachar

The Janshakti News

भूगोलाचा इतिहास: काळाला दुभागणारी रेषा.| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जून २०२४
एकाच दिवशी दोन व्यक्तींपैकी एकजण पूर्व बाजूकडून पृथ्वीप्रदक्षिणेला गेल्यास ती शनिवारची तर दुसरी व्यक्ती पश्चिम बाजूने गेल्यास ती शुक्रवारची संध्याकाळ असे असू शकते का ? ही साधारणपणे५०२ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. १५२२ चा जुलै महिना होता आणि ठिकाण होते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेस समुद्रात असणारे केप व्हर्डे. फर्डीनांड मॅगेलान हे पहिल्या पृथ्वीप्रदक्षिणेची मोहीम यशस्वी करून त्या दिवशी परतले होते. कल्पनातीत अडचणी तसेच संकटांनी भरलेल्या या प्रवासात खुद्द मॅगेलानचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तीन वर्षांपूर्वी निघालेली पाच जहाजे आणि २७० माणसांपैकी फक्त व्हिक्टोरिया हे एक जहाज आणि १८ माणसे परतली होती. मॅगेलानच्या मृत्यूनंतरही पश्चिमेकडून पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून आता ते रसदीसाठी केप व्हर्डेला थांबले होते. परतलेल्यांपैकी मोहिमेचा नोंदकर्ता (cronicler) अंटॉनिओ फिजापेट्टा याने त्या दिवशीचा एक अनपेक्षित प्रसंग नोंदवला आहे. व्हिक्टोरिया जहाजावरील लोक खरेदीसाठी केप व्हर्डे बंदरावर गेले तेव्हा त्यांच्या लेखी तो दिवस होता बुधवार ९ जुलै १५२२. पण त्या गावात मात्र तो होता गुरुवार १० जुलै १५२२. जहाजावरील नोंदींमध्ये तर कुठेही चूक नव्हती. हे अकल्पितच होते. याचा अर्थ त्यांच्या पृथ्वीप्रदक्षिणेत एक दिवस गहाळ झाला होता. असे का व्हावे याचे स्पष्टीकरण मात्र कुणीच देऊ शकले नाही. पुढे खगोलतज्ज्ञ व व्हेनिसचे स्पेनमधील राजदूत कार्डिनल गेस्पारो काँटारीनी यांनी या चमत्काराचे भौगोलिक स्पष्टीकरण दिले.

खरे तर हे अगदीच अनपेक्षित नव्हते. चौदाव्या शतकातील अरब भूगोलतज्ज्ञ अबुलफिदा याने त्याच्या ग्रंथात यासंबंधी भाकीत केले होते व त्याचे कारणही दिले होते. तेच स्पष्टीकरण काँटारींनी यांनी दिले. पश्चिम दिशेने जाणारा माणूस आपल्या एका पृथ्वीप्रदक्षिणेत स्थिर माणसाच्या तुलनेत एक दिवस मागे पडेल तर पूर्व दिशेने पृथ्वीप्रदक्षिणा करणारा माणूस एक दिवस पुढे जाईल असे अबुलफिदाने सांगितले होते. त्याचे कारण त्याने असे दिले की पश्चिमेकडे जाणारा माणूस सूर्याच्या भासमान मार्गाच्या दिशेने (म्हणजे पृथ्वीच्या परिवलनाच्या उलट दिशेने) जात असतो. त्यामुळे आपल्या एका प्रदक्षिणेत तो पृथ्वीपेक्षा एका फेरीने, म्हणजे एक दिवसाने मागे पडेल. उलट पूर्वेकडे जाणारा माणूस पृथ्वीच्या फिरण्याच्या दिशेने जात असतो. त्यामुळे त्याची एक प्रदक्षिणा जास्त होऊन तो एक दिवस पुढे जातो. अबुलफिदाचे ते भाकीत मॅगेलानच्या पृथ्वी प्रदक्षिणेमुळे २०० वर्षानंतर खरे ठरले. पुढे ६० वर्षांनी त्याची पुनरावृत्ती झाली. इंग्लंडचा फ्रान्सिस ड्रेक याने १५७७ ते १५८० मध्ये पश्चिमेकडून पृथ्वीप्रदक्षिणा केली. तो २६ सप्टेंबर १५८० रोजी सोमवारी प्लायमाऊथ बंदरावर पोहोचला. पण तो ड्रेकच्या दृष्टीने २५ सप्टेंबर रविवार होता. कालमापनात निर्माण होणारा असा गोंधळ दूर करण्यासाठी काहीतरी करणे भाग होते. पण प्रत्यक्षात ते होण्यास, म्हणजे आंतरराष्ट्रीय वाररेषा अस्तित्वात येण्यास आणखी ३०० वर्षे जावी लागली. कारण मॅगेलान व ड्रेकसारखी उदाहरणे फार क्वचित घडत असल्याने व्यवहारात फारसे बिघडत नव्हते. पुढे एकोणिसाव्या शतकात वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा वापर सुरू झाला. पूर्व आणि पश्चिम गोलार्धातून मोठ्या प्रमाणावर दोन्ही दिशेने वाहतूक सुरू झाली. त्यामुळे मग या संदर्भात काही तरी करण्याची गरज निर्माण झाली.


ही समस्या नेमकी कशी व का निर्माण होते, हे कळण्यासाठी सोबतची आकृती पहा. आज दि. ८ जून रोजी शनिवारी सकाळी ६ वाजता पृथ्वीवर विविध रेखावृत्तावरील स्थानिक वेळ त्यात दर्शवली आहे. दर १५ अंश रेखावृत्तास स्थानिक वेळेत एक तासाचा फरक पडतो. पूर्वेकडील वेळ पुढे असते तर पश्चिमेकडील वेळ मागे असते. त्यामुळे ४५ अंश पूर्ववर शनिवार सकाळचे नऊ, ९० अंश पूर्ववर शनिवार दुपारचे १२, १३५ अंश पूर्ववर दुपारचे तीन आणि १८० अंशावर शनिवार सायंकाळचे सहा वाजले असतील. या उलट ४५ अंश पश्चिम रेखावृत्तावर शनिवार पहाटेचे तीन, ६० अंश पश्चिमेवर मध्यरात्रीचे १२ (शुक्रवारची मध्यरात्र), १३५ अंश पश्चिमवर शुक्रवार रात्रीचे नऊ आणि १८० रेखावृत्तावर शुक्रवार सायंकाळचे सहा वाजले असतील. म्हणजे १८० अंशावर संध्याकाळचे सहाच वाजलेले असतील. पण पूर्व बाजूकडून गेल्यास ती शनिवारची संध्याकाळ तर पश्चिम बाजूने गेल्यास शुक्रवारची संध्याकाळ असेल. आता एक व्यक्ती पूर्वेकडून १८० रेखावृत्त ओलांडून पुढे जाईल तेव्हा तिने पुढे शनिवार मानावा की शुक्रवार ? तसेच दुसरी व्यक्ती पश्चिमेकडून १८० अंश ओलांडून पुढे येईल तेव्हा तिने शुक्रवार मानावा की शनिवार असा पेच निर्माण होतो.

हा पेच सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाररेषेची गरज भासते. इंग्लंडमधील ग्रिनीचवरून जाणारे रेखावृत्त हे मूळ किंवा शून्य अंश रेखावृत्त मानले जाते. पृथ्वीगोलावर त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूस असलेली व उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणारी काल्पनिक रेषा म्हणजे १८० अंश रेखावृत्त होय. हे रेखावृत्त स्थूलमानाने आशियाचा ईशान्य कोपरा व कॅनडा यांच्या मधून गेलेले आहे. हे १८० रेखावृत्त हेच आंतरराष्ट्रीय वाररेषा किंवा दिनांक रेषा आयडीएल -इंटरनॅशनल डेट लाइन मानण्याचे १८८४ मध्ये ठरवण्यात आले. ते ओलांडताना कालमापनात पुढीलप्रमाणे बदल करावा असे ठरले. पश्चिमेकडून प्रवास करीत १८० अंश रेखावृत्त ओलांडताना एक दिवस पुढे करावा. म्हणजे तुमच्या घड्याळानुसार शुक्रवार संध्याकाळचे सहा वाजले असतील तर ते ओलांडताच शनिवार संध्याकाळचे सहा वाजलेत असे समजावे. या उलट तुम्ही पूर्वेकडून पश्चिमेकडे ती रेषा ओलांडत असाल तर एक दिवस मागे करावा. म्हणजे तुमच्या घड्याळानुसार शनिवार संध्याकाळचे सहा वाजले असतील तर ती रेषा ओलांडताच ती शुक्रवारची संध्याकाळ आहे असे समजावे. अर्थातच ही रेषा काल्पनिक असून ती प्रत्यक्ष पृथ्वीवर कुठेही रेखलेली नसून ती फक्त नकाशावर अस्तित्वात आहे.

अशा प्रकारे १८० रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा कल्पून समस्या सोडवण्यात आली. अर्थातच रेखावृत्त ही एक काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषा असून वेडीवाकडी नसते. पण या रेखावृत्ताचा बराच भाग पॅसिफिक समुद्रातून गेलेला असला तरी काही ठिकाणी ते बेटे व जमिनीवरून गेलेले आहे. जमिनीवरून वाररेषा जात असल्यास ते व्यवहारात फार गैरसोयीचे होईल. उदाहरणार्थ ही रेषा एखाद्या गावातून जात असेल तर एकाच गावात दोन तारखा असतील. किंवा एका घरात शुक्रवार तर दुसऱ्या घरात शनिवार असेल. हा गोंधळ टाळण्यासाठी नकाशावर आंतरराष्ट्रीय वाररेषा काही ठिकाणी (जिथे बेटे किंवा जमीन आहे तिथे) वेडीवाकडी गेलेली दिसते, आणि त्यानुसार दिनांक किंवा वारबदल केला जातो.

कुणी अशी कल्पनाही केली नव्हती की एखादी रेषा ओढून काळाला दुभागता येईल आणि त्याला मागे पुढे करता येईल. पण अशी अद्भुत रेषा कागदावर तरी अस्तित्वात आहे, तिच्या आधारे व्यवहारही चालतो आणि ती काळाप्रमाणेच अदृश्यही आहे. हे सर्वच किती अद्भुत आहे ?