yuva MAharashtra बदले बदले से मोदी..

बदले बदले से मोदी..



| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. ८ जून २०२४
नरेंद्र मोदी आणि संघाचं नातं खूप जुनं आहे. एका मराठी माणसामुळे.. लक्ष्मणराव इनामदार म्हणजे 'वकील साहेबांमुळे मोदी संघाशी जोडले गेले. 1972 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनले, नंतर 1980 साली भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता. त्यानंतर 2001 साली गुजरातचे मुख्यमंत्री आणि शेवटी 2014 साली देशाचे पंतप्रधान. असा नरेंद्र मोदींचा प्रवास आपण पाहिला आहे. या कार्यकाळात संघाची साथ त्यांना कायम लाभली. किंबहुना आपल्या प्रचारकाला पंतप्रधान बनवण्यात संघाचा किंगमेकरचा रोल राहिला.

असं असलं तरी 2014 ते 2024 काळ बराच बदलला आहे. नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते आजही नक्की तेवढेच घट्ट आहे का असे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यातच ह्या खेपेला संघाने निवडणुकीत भाजपाचे काम केले का हाही प्रश्न होता. संघाला मानणारा कोअर मतदार हा खरंच ह्या खेपेला मतदानाला बाहेर निघाला का? अनेकांनी नोटा दाबले का? अशा चर्चा सुरु झाल्या. त्यात संजय राऊतांचं राजकीय वक्तव्य समोर आले. पण ज्यांना संघ समजतो त्यांना माहिती आहे कि संघ हा कुठलाही निर्णय तडकाफडकी घेत नाही. अगदी आपली हाफ पँटची फुल पँट करायची का हा निर्णय सुद्धा जवळ जवळ 5 वर्षांच्या विचारांती घेण्यात आला.


संघात व्यक्तीपेक्षा संघटना जास्त महत्वाची मानली जाते. नवे व्यक्तिकेंद्रित भाजप संघाला मान्य आहे का हा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. पण जोपर्यंत संघाचा अजेन्डा मोदी पूर्ण करत आहेत तोपर्यंत त्यांना विरोध करण्याचे कारण संघाकडे नसावे. त्यातच वाजपेयी सरकार असताना सरसंघचालक सुदर्शनजींनी केलेले काही उघड विरोध आणि त्याचे विपरीत परिणाम हे संघाने सुद्धा अनुभवाच्या खाती लिहून ठेवले आहेत. विसंवाद असूही शकतो. पण त्याला हाताळण्याची यंत्रणा आणि पद्धत संघात आहे आणि ती एखाद्या निवडणुकीच्या निकालाशी तरी नक्कीच जोडलेली नाहीये.

2014 आणि 2019 असे सलग दोन टर्म एकट्या भाजपला देशातील मतदारांनी 272 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या. या 10 वर्षाच्या काळात फक्त मोदींचाच चेहरा सगळीकडे दिसत होता. सरकार म्हणायला एनडीएचं असलं तरी त्याची खरी ओळख मोदी सरकार अशीच होती. एनडीएतील काही जुने मित्र पक्ष सोडून गेले होते. जे सोबत होते ते फक्त शरीरानेच सोबत आहेत अशी स्थिती होती. 2024 च्या लढाईच्या सुरुवातीला ज्या क्षणी मोदी विरोधकांनी एकत्र येत इंडी आघाडीची घोषणा केली त्या क्षणापासून भाजप मित्र पक्षांचे 'अच्छे दिन' पुन्हा सुरु झाले. मोदींनी तडकाफडकी एनडीएची बैठक बोलावत आम्ही सगळे सोबत आहोत हा संदेश दिला.

मतदारांनी भाजपला 272 च्या बरंच खाली रोखलं आणि पुन्हा एकदा भाजप मित्र पक्षांचा भाव वधारला. आपल्या फ्रेममध्ये शक्यतो कुणीही येणार नाही किंवा कोण येतंय याची बारकाईनं काळजी घेणारे, कॅमेऱ्याच्या आणि त्यांच्या मध्ये कोणी आलंच तर त्याला प्रेमाने बाजूला सारणारे मोदी आपण गेली 10 वर्ष पाहिले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मित्रपक्षातील नेत्यांसोबत हसताना, गप्पा मारताना, एकदम कॅज्युअल मूडमधले मोदी आपण पाहात आहोत. आज त्यांच्या भाषणातही एनडीए हा शब्द मोदी या शब्दापेक्षा जास्त वेळा आला असेल. हा बदल स्वागतार्ह आहे. पुढची पाच वर्ष मोदींना आपल्या सगळ्या मित्रांची काळजी घ्यावी लागणार आहे. मोदी म्हणाले तसं एनडीए गुड गव्हर्नन्स आणि राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करत राहील अशी आशा.

हा निवडणूक निकाल सगळ्यांना काही ना काही शिकवणारा ठरला. ज्या मोदींनी देशभरात विकासकामांवर जोर दिला आणि ज्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभा राहिलं.. ज्यांच्या कार्यकाळात काशी, मथुरेतील मंदिरं अतिक्रमणातून मुक्त होतील अशी देशातील हिंदूंना आशा होती त्याच मोदींचं वाराणसीत मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं. 2014 साली पावणे चार लाख, 2019 साली पावणे पाच लाखांनी जिंकणाऱ्या मोदींना यावेळी फक्त दीड लाख मतांनी विजय मिळाला. नागपूरच नाही तर देशात विकासाच्या महामार्गाचं जाळं विणणाऱ्या नितीन गडकरींना सुद्धा फक्त 1 लाख सदोतीस हजार मतांनी विजय मिळालाय.

या सगळ्यातून मोठी, महत्वाची शिकवण, लोकसभेत सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या. सर्वात मोठा पक्ष भाजपला मिळाली असेल. मतदारांना गृहीत धरु नका. विरोधकांना हलक्यात घेऊ नका. जुन्या मित्रांचा मान सन्मान राखा. नवे मित्र जोडता आले नाहीत तरी चालेल पण जुन्या मित्रांना विनाकारण गमावू नका. आपली विकास कामं जनतेपर्यंत पोहचतायत का याकडे लक्ष द्या. आपली इमारत ज्या पायावर, ज्या कोअरवर मजबूत उभा आहे त्या छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांच्याा बलिदानाचा विसर पडू देऊ नका. नवी टीम बनवण्याच्या नादात पक्षातील जुन्या सहकाऱ्यांना खड्यासारखं दूर सारण्याआधी दहा वेळा विचार करा. एकाच चेहऱ्यावर अवलंबून राहण्याचा अतिरेक टाळा, गाफिल राहू नका.

खरंतर याच बाबी इतर सर्वच पक्षांना आणि नेत्यांनाही लागू होतील. सर्वच पक्षातील राजकारण्यांकडून सामान्य मतदारांच्या फार काही अपेक्षा नसतात. फक्त उतू नका, मातू नका देशसेवेचा, सर्वांच्या विकासाचा घेतला वसा टाकू नका हीच माफक अपेक्षा असेल.