Sangli Samachar

The Janshakti News

निवडणुकीच्या सगळ्या गदारोळात एक गंभीर घटना घडून गेली आहे .!



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ८ जून २०२४
National Testing Agency (NTA) ने मेडिकल एन्ट्रन्स एक्झाम (NEET)चा रिझल्ट चौदा जूनला जाहीर करणार असं जाहीर करुनही दोन दिवसांपूर्वी answer key पब्लिश करुन अचानक कालच रिझल्ट जाहीर केला.
त्यामुळे निवडणूक निकालांच्या धुमश्चक्रीत या मोठ्या घोटाळ्याला ना प्रसिध्दी मिळाली ना कुणाचे लक्ष गेले.

१. एरवी एखाद्या दुसऱ्याला 720/720 पडतात तिथे ह्यावर्षी तब्बल 67 जणांना तितके मार्क पडले आहेत !
२. पहिल्या शंभर जणांची यादी NTA त्यांच्या वेबसाईटवर जाहीर करते. त्यात 62 ते 69 ही मुले हरियाणाच्या एकाच परीक्षा सेंटरमधून आहेत. ह्या सातही जणांनी त्यांची आडनावे लावली नाहीयेत. (फॉर्म भरतानाच ही काळजी घेतली होती). त्यामुळे कुणाची संपूर्ण identity समजायला मार्ग नाही. तामिनाडूमधल्या चार, बिहारमधल्या दोनतीन एकाच सेंटरमधल्या मुलांनाही 720/720 गुण मिळाले आहेत. एकाच माणसावर त्याच्या आयुष्यात दोनदा वीज पडण्याच्या शक्यतेइतकं दुर्मिळ असावं असं हे प्रकरण आहे.

३. 68 आणि 69 रँकवर असलेल्या मुलांना 718 आणि 719 मार्क्स आहेत, की जे NEET च्या negative मार्किंग सिस्टिममधे पडूच शकत नाहीत. NTA ला काही जणांनी विचारले असता त्यांनी त्या मुलांना पेपर उशिरा हातात मिळाल्याने ग्रेस मार्क दिले असं स्पष्टीकरण दिलं आहे. पेपर उशिरा मिळालेले देशभरात हजारो मुलं आहेत. पैकी त्या दोघांना ग्रेस मार्क कसे मिळाले? किती मिळाले? NTA ला नेमकं कसं समजलं की ह्या दोन मुलांना उशिरा पेपर मिळाले? सातशेच्या इतक्या पुढं मार्क असलेल्यांना वेळ पुरला नाही असं कसं म्हणता येईल? असे अनेक प्रश्न आहेत.


४. बऱ्याच मुलांचे रँक डेसिमलमधेही आहेत. आता बोला!

५. NEET चा पेपर लीक झाला होता (गुगल केल्यावर ह्याचा पर्दाफाश करणारे अनेक व्हिडिओ दिसतील).

अपार मेहनत करुन, भविष्याची स्वप्नं बघत मुलं परीक्षा देतात तर हे लोक त्यांच्या भविष्याशी, संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांशी क्रूर खेळ करत आहेत. एरवी 600 मार्कांना सरकारी वैद्यकीय कॉलेजेसमधे प्रवेश मिळतो, तर ह्यावर्षी 690 वाली मुलेही रडत आहेत, आणि त्यांना प्रवेशाची खात्री नाहीये. बरेचजण रिपीट परीक्षा देणारे असतात. त्यांनीही काय करायचं ? रक्ताचं पाणी करुन साडेसहाशे मार्क्स मिळवणारा विद्यार्थी टेलीग्रामद्वारे फुटलेला पेपर काही पैसे टाकून विकत घेवून सहजपणे अश्या प्रकारे सातशे मार्क मिळवणाऱ्याच्या हजारो रँक्सने मागे आहे. किमान दोन वर्षं केलेल्या त्याच्या मेहनतीचा, स्वप्नांचा चुराडा झाला आहे. युपीएससी, आयपीएससी, शिक्षक, पोलीस, बँकभरतीपासून तमाम परीक्षेत होणारे घोटाळे, पेपरफुटी आणि व्यवस्थेतला गहाळपणा, भ्रष्टाचार ही गेल्या दोनतीन वर्षातली सामान्य बाब झाली आहे.

एखाद्याचं आयुष्य बरबाद होऊ शकणारी ही अनागोंदी कुठवर चालणार आहे ?