Sangli Samachar

The Janshakti News

हुल्लडबाजीमुळे यंदाही वर्षा पर्यटनाला बंदी राहणार ?| सांगली समाचार वृत्त |
बेळगाव - दि. ८ जून २०२४
पावसाळ्याला सुरुवात होत असल्याने अनेकजण पावसाळी पर्यटनावर भर देणार आहेत. मात्र, दोन वर्षे वन खाते आणि जिल्हा प्रशासनाकडून वर्षा पर्यटनावर बंदी घातल्याने यंदाही ती कायम असणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी होणारी हुल्लडबाजी, 'सेल्फी'च्या मोहापायी जीव धोक्यात घालणे, आदी प्रकारांमुळे पावसाळ्यातील निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली जात आहे.

बेळगाव जिल्हा निसर्गसौंदर्यासाठी नेहमीच साद घालतो. खानापुरातील भीमगड, गोकाक फॉल्स (Gokak Falls), गोडचिनमलकी, हिडकल डॅम (Hidkal Dam), राकसकोप डॅम ही सर्व ऋतुमानातील पर्यटकांना आकर्षित करणारी ठिकाणे आहेत. हिरवीगार, थंड हवा, ट्रेकिंगचे साहसी आनंद लुटण्यासाठी कणकुंबी, भीमगड, हलशी, हंडी ‌भडंगनाथ, दांडेली, नागरगाळी, तिलारी येथे जाता येते.‌ ही सर्व क्षेत्रे वनखात्याच्या अखत्यारित येत असून, ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत. धामणे ते तिलारी हा नवा वॉकिंग ट्रॅक वन खात्याने तयार केला आहे.

पावसात भिजण्यासाठी तरुणाई बेपर्वा होते. धबधबे पाहण्याचे निमित करून हुल्लडबाजी वाढली आहे. मागील काही वर्षांत हे प्रकार आणखीन वाढले आहेत. पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यांवर वाहने बेशिस्त लावणे, वाहनात बसूनच मद्यपान करणे, रस्त्यावर वाहने आडवी थांबवून ध्वनिवर्धक लावून रस्त्यावर धिंगाणा घालणे, धबधब्याला चिकटून 'सेल्फी'चे धाडस करण्याची बेपर्वाई, वॉटरफॉलच्या पुढे उभे राहून विविध पोजमधील 'सेल्फी' काढून समाज माध्यमांवर टाकणे, धागडधिंगा, कोणी हटकल्यास त्यांच्याशी हुज्जत घालत मारहाण करणे अशा घटनांत वाढ झाली आहे.


पावसाळ्यात 'ओली पार्टी' करण्यासाठी युवक मोठ्या प्रमाणात जातात. तलाव, नदी, नाले यांच्या कोपऱ्यावर अशा पार्ट्या रंगू लागल्या आहेत. पाण्याचा नेमका अंदाज येत नसल्याने, तसेच मद्यधुंद अवस्थेत बुडून मृत्युमुखी पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. 'सेल्फी' काढायला जाऊन उंच धबधब्यावरून पडण्याचा घटना घडल्या आहेत. दूधसागर धबधब्यात बुडणाऱ्यांची संख्या वाढल्याने गोवा वन विभागाने पाच वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी बंद केला.

आंबोली धबधब्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी वाढल्याने पोलिस कारवाई केली जात आहे. माणमधील (ता. खानापूर) धोकादायक शिंबोळी धबधब्याच्या डोहात २०२२ ला बुडून तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर धबधबा परिसरात प्रवेश करण्यास निर्बंध घातले आहेत. सलग दोन वर्षे हे निर्बंध कायम राहिले असून यंदा हे निर्बंध राहणार का, हे पाहावे लागणार आहे.

जिल्ह्यातील धबधबे

गोकाक
गोकाक फॉल्स
गोडचिनमलकी
जांबोटी आणि कणकुंबी मार्गे :
सुर्लजवळ वझर धबधबा
सडाजवळील धबधबा
चिखलेपारवाड रस्त्यावरील सवतुरा धबधबा
मानजवळील सिम्बॉला वझर
हुळंदजवळ तळीचा वझर
पारवाड येथील देऊची न्हय धबधबा
कॅसलरॉक दूधसागर धबधबा
जांबोटीजवळ वज्रपोहा
बेळगाव
महिपाळगडाजवळील सुंडी धबधबा
ढोलगरवाडीजवळील सुंडी धबधबा
हिडकल डॅम
पावसाळी प्रेक्षणीय पॉईंट
चोर्ला घाट
जांबोटीजवळील हब्बनहट्टी
तिलारीनगर येथील स्वप्नवेल पॉईंट
तिलारी घाटमाथा
तिलारीजवळ ग्रीन व्हॅली
दोडामार्गजवळ मंगेली,
आजारा रामतीर्थ धबधबा