Sangli Samachar

The Janshakti News

राज्यातील 'या' जागांवर काँग्रेसचाच बोलबाला !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ७ जून २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये मरणासन्न अवस्थेत गेलेल्या काँग्रेसने जोरदार भरारी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 मध्ये अवघी एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र, 2024 मध्ये काँग्रेसने गरुडझेप घेत तब्बल 13 जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसला दुय्यम भूमिका घ्यावी लागली होती. तरीसुद्धा काँग्रेसने आपला स्ट्राईक रेट वाढवताना राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.

संविधान बचावचा नारा खोलवर गेला

भाजपने दिलेला चारशे पारचा नारा देशाचे संविधान बदलण्यासाठी असल्याचा उलट नारा काँग्रेसकडून देण्यात आला होता. राहुल गांधींचा प्रचारात हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. दरम्यान या नाऱ्याचे महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटल्याचे स्पष्ट दिसत आहे. राज्यात राखीव मतदारसंघांमध्ये काँग्रेसने सहा ठिकाणी विजय मिळवला आहे. एका ठिकाणी भाजपला विजय मिळवता आला आहे. तर उर्वरित प्रत्येकी एक जागा शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला गेली आहे. भाजपने 2019 च्या निवडणुकीमध्ये राखीव जागांवर पाच ठिकाणी विजय मिळवला होता. मात्र, आता त्यांची फक्त एका जागेवर घसरण झाली आहे. यावरूनच संविधान बचावचा नारा खोलवर गेल्याचे दिसून येत आहे.


राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचा बोलबाला

राज्यामध्ये महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला 29 जागा मिळाल्या आहेत, तर एका जागेवरती अपक्ष उमेदवार विशाल पाटील सांगलीतून विजयी झाले आहेत. ते सुद्धा मुळ काँग्रेसचेच आहेत. त्यामुळे ते काँग्रेस सोबत राहतील अशी चिन्हे आहेत. राज्यात काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने मोठी झेप घेत राज्यातील सर्वाधिक संवेदनशील असलेल्या राखीव जागांवर सुद्धा विजय मिळवत आपला झेंडा प्रस्थापित केला आहे. राज्यात एसटींसाठी राखीव असलेल्या नंदुरबार, पालघर, दिंडोरी, गडचिरोली चिमूर या मतदारसंघांपैकी दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या आहेत. यामध्ये नंदुरबारची जागा काँग्रेसने एक लाख 59 हजार120 मतांनी जिंकली आहे.

गडचिरोली चेंबूर लोकसभा मतदारसंघ सुद्धा काँग्रेसने जिंकला असून या जागेवरती एक लाख 41 हजार 696 मतांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जागा 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडे होत्या. मात्र, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने थेट लढतीत भाजपला पराभवाचा धक्का दिला आहे. पालघर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विजय मिळवला असून या जागेवर ठाकरेंचा खासदार 2019 मध्ये होता. भाजपने ही जागा एक लाख 83 हजार 3306 मतांनी जिंकली आहे.

एससीसाठी राखीव असलेल्या जागांवर काँग्रेस चार ठिकाणी विजयी

दुसरीकडे एससीसाठी राखीव असलेल्या अमरावती, रामटेक, लातूर, सोलापूर या चार जागांवरती काँग्रेसने विजय मिळवला आहे. यामध्ये सुद्धा भाजपकडून दोन जागा खेचल्या आहेत. नवनीत राणांचा पराभव करत अमरावतीची जागा सुद्धा भाजपकडून आपल्याकडे खेचण्यात काँग्रेसला यश आला आहे. दुसरीकडे शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवाराने आणि एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांचा पराभव करत जागा खेचून आणली आहे.

अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसने 19 हजार 731 मतांनी विजय मिळवला. रामटेकमध्ये काँग्रेसने 76 हजार 768 मतांनी विजय मिळवला,. तर लातूरमध्ये 61881 मतांनी विजय मिळवला. सोलापूरमध्ये 74,197 मतांनी विजय मिळवत राज्यातील राखीव जागांवर झेंडा प्रस्थापित केला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या संविधान बचाव हाकेला साथ दिल्याचे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातून प्रवेश करत महाराष्ट्रात आली होती. या ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे.