Sangli Samachar

The Janshakti News

विदर्भातील जागृत शिवमंदिर; जिथे शतकांपासून तपश्चर्या करतोय नंदी !



| सांगली समाचार वृत्त |
अमरावती - दि. १ जून २०२४
संपूर्ण जगभरात अनेक प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगवेगळा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराची काही ना काही वैशिट्य आहेत. यांपैकी बरीच खास, अद्भुत आणि अलौकिक मंदिरे महाराष्ट्रात पहायला मिळतात. अशाच एक अद्भुत मंदिराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ते मंदिर म्हणजे, विदर्भातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कोंडेश्वर. हे मंदिर सुमारे ५००० हजार वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे, सांगितले जाते. विशेष म्हणजे या मंदिरात महादेवासमोर नंदी गेली अनेक शतके तपश्चर्या करताना दिसतोय. चला या मंदिराविषयी अधिक माहिती घेऊया.

कोंडेश्वर मंदिराचा इतिहास

अमरावती शहरापासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर डोंगरांच्या मध्यात श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर उभारलेले आहे. अनेक राज्यसत्तांच्या काळात श्रीक्षेत्र कोंडेश्वराचा उत्कर्ष झाला. वाकाटक आणि गुप्तकाळात या मंदिराची प्रतिष्ठा वाढली. प्राचीन काळी या ठिकाणी काशी, प्रयागराज, ओमकारेश्वर आणि अन्य स्थानावरून ऋषीमुनी, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, साधुसंत, भाविक आणि शिवभक्त येत असत. रामदेवराव यादव आणि कृष्णदेवराव यादव या घराण्यातील राज्य सत्तेच्या काळात त्यांचे पंतप्रधान हेमांद्रीपंत यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. त्यापैकी एक म्हणजे श्री क्षेत्र कोंडेश्वर. या मूळ मंदिराला लावलेले शिलाखंड व त्यावरील कोरीव काम पाहता हे मंदिर सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी बांधले असावे असा तज्ञांचा अंदाज आहे


कोंडेश्वर मंदिराचे बांधकाम

श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर हे काळ्याभोर पाषाणाचे चिरे एकावर एक रचून बांधण्यात आलेले अत्यंत सुंदर असे शिव मंदिर आहे. हेमाडपंथी स्वरूपात उभारण्यात आलेल्या या मंदिराची उंची पूर्वी १२ फूट इतकीच होती. मात्र, पुढील काही वर्षात या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी पूर्वी असणाऱ्या काळा पाषाणच वापरून या मंदिराची उंची ७५ फूट इतकी करण्यात आली. या मंदिराच्या बाहेर बसविलेल्या दगडी चिऱ्यांच्या पायथ्याशी हत्ती कोरलेले आहेत. या हत्तींच्या दोन शरीरांना एक मुख तर काही ठिकाणी दोन मुखांना एका हत्तीचा देह दिसून येतो. विशेष म्हणजे, एका बाजूने हे हाती मोजल्यास जितकी संख्या होते तितकी संख्या दुसऱ्या बाजूने मोजल्यास होत नाही. यामुळे कोरलेल्या हत्तींची निश्चित संख्या किती आहे? हे सांगणे कठीण.

विदर्भातील जागृत देवस्थान

श्री क्षेत्र कोंडेश्वर हे विदर्भातील अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. आजपर्यंत अनेक भाविकांनी कोंडेश्वराचा गाभारा जलामृताने भरण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच काय तर, कोंडेश्वरावर पाण्याची सतत धार सुरू असते. तरीसुद्धा, कोंडेश्वराचे लिंग पूर्णपणे पाण्यात कधीच बुडत नाही. मंदिरातील पाणी बाहेर जाणार नाही याची पूर्ण दक्षता घेऊनही हजारो लिटर पाणी नेमके कुठे जाते वा मुरते? याचा आजवर शोध लागलेला नाही. या गाभाऱ्यात एकूण बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिमांचीदेखील स्थापना करण्यात आली असून, हे देवस्थान जागृर आहे अशी मान्यता आहे.

तपश्चर्या करणारा नंदी

श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिराची एक खासियत सांगायची म्हणजे इतर शिव मंदिरांप्रमाणे या मंदिरातही नंदीची मूर्ती आहे. कोंडेश्वराच्या गाभाऱ्याकडे जाताना एक भला मोठा नंदी गाभाऱ्याच्या खाली उतरणाऱ्या द्वारासमोर बैठक मांडून बसलेला दिसतो. या नंदीला अग्र पूजेचा मान असून त्याची बैठक नीट पाहिल्यास तो तपश्चर्या करीत असल्याचा भास होतो. त्यामुळे असे म्हटले जाते की, या शिवमंदिरात नंदी गेल्या अनेक शतकांपासून तपश्चर्येत लीन आहे.