| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २ जून २०२४
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच्या सर्व ५४३ जागांसाठी मतदान झाल्यानंतर काल अनेक वृत्तवाहिनीनी एक्झिट पोल सादर केले. देशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचचा बोलबाला राहील आणि महाविकास आघाडीला २५ जागा मिळतील असा अंदाज समोर आला आहे तर सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होतील असं एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आलं आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कोणता अपक्ष जिंकतोय? का जिंकतोय ते आम्हाला माहित आहे. आम्ही काय गोट्या खेळात नाही असं संजय राऊतांनी म्हंटल.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी एक्झिट पोलबाबत भाष्य केलं. राऊत म्हणाले, मला माहितेय महाराष्ट्रात काय होणार आहे? पश्चिम महाराष्ट्रात काय होतंय? कोणता अपक्ष जिंकतोय? का जिंकतोय ते आम्हाला माहित आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला माहितेय. आम्ही काय गोट्या खेळत नाही. आमचं आयुष्य सुद्धा राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेत गेलंय. मी यावर नंतर बोलणारच आहे असं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षरीत्या विशाल पाटलांना आणि काँग्रेसला इशारा दिला आहे.
सांगलीत नेमकं काय घडलं ?
सांगली हि तस बघितली तर काँग्रेसची हक्काची जागा…. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेली आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र त्यानंतर नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल करून महाविकास आघाडीलाच आव्हान दिले. एवढच नव्हे तर मी काँग्रेसचाच आहे असेही ते वारंवार सांगत होते. विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे सांगलीत संजय पाटील, विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील अशी तिरंगी लढत झाली. विशाल पाटलांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा हात आहे अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. त्यातच काल एक्झिट पोलमध्ये सांगलीत विशाल पाटील आघाडीवर राहिल्याने या चर्चाना आणखी बळ मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या इशारा दिला.