Sangli Samachar

The Janshakti News

संघाची मोदींविरोधात मोर्चे बांधणी ?



सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ जून २०२४
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. संघाला कोणत्याही स्थितीत मोदींना पंतप्रधानपदापासून दूर ठेवायचे आहे. यासाठी त्यांनी आपल्या निष्ठावंत खासदारांना मोदींविरोधात आवाज उठवून सातत्याने त्यांच्यावर दबाव टाकण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे मोदींना पर्याय म्हणून संघ 3 नावांवर विचार करत असून, त्यात नितीन गडकरी यांच्या नावाचा समावेश असल्याचेही सांगितले जात आहे.


राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. एनडीएतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी मोदींच्या नावाला पसंती दिली आहे. यामुळे मोदींच्या शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत भाजपचे घटलेले संख्याबळ पाहता संघ परिवारात वेगळ्याच घडामोडी सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर संघ परिवार एनडीएचे नेतृत्व करण्यासाठी दुसऱ्या नावांचा विचार करत असल्याची माहिती दिली.

एका वृत्तपत्रानुसार, भाजपच्या घटलेल्या संख्याबळाकडे आरएसएस आपल्या मर्जीतील नेत्याची पंतप्रधानपदी वर्णी लावण्याची संधी म्हणून पाहत आहे. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 282 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये 303 जागांवर यश मिळवले होते. या दोन्ही निवडणुकांत भाजपने स्वबळावर बहुताचा जादुई आकडा गाठला होता. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा आकडा 240 पर्यंत खाली घसरला. यावरून मोदींची लोकप्रियता झपाट्याने घटल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे त्यांच्या जागी नवा चेहरा देण्याची गरज आहे, असे संघातील सूत्रांनी सांगितले आहे. संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, संघ सध्या मोदींना पर्याय कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांची नावे चर्चेत आहेत. पण यापैकी कुणाचेही अद्याप नाव अजून निश्चित झालेले नाही.