Sangli Samachar

The Janshakti News

आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने मोदींच्या तिसऱ्या टर्मचे महत्व !सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ८ जून २०२४
देशांतर्गत विषयांवर कदाचित मतभेद असतील. तथापि, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीकोनातून विचार केला तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परदेशात भारताची एक ठळक प्रतिमा निर्माण केली. दक्षिण आशियातील प्रमुख देश म्हणून भारताची दखल घेतली जाते.

एएफपीच्या बातमीनुसार कमी संख्याबळाने पुन्हा विजयी झालेल्या मोदी यांची सगळ्यांत शक्तीशाली देशांच्या नेत्यांच्या यादीत आजही तेवढीच ताकद राहील. जगातील सगळ्यांत मोठी लोकशाही आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचे मोदी प्रतिनिधीत्व करतात आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील आंतरराष्ट्रीय संबंध विषयावरील प्राध्यापक हर्ष पंत म्हणाले की सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असल्यामुळे जागतिक स्तरावरील सगळ्यांत वरिष्ठ नेत्यांमध्ये मोदी यांचा समावेश झाला आहे. स्वत:साठी आणि भारतासाठी त्यांच्या काही महत्वाकांक्षा आहेत. त्याच्याशी ते कोणती तडजोड करतील याची शक्यता दिसत नाही.


अमेरिका आणि युरोपशी संबंध

अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत भारत क्वाड गटाचा सदस्य आहे. आशिया- प्रशांत क्षेत्रात चीनच्या मुजोरीला अटकाव घालण्यासाठी हा गट सक्रिय आहे. भारत आणि अमेरिका यांची भागिदारी ही २१ व्या शतकातील निर्णायक भागिदारी असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनीही म्हटले आहे. भारत अमेरिकेकडून अत्याधुनिक ड्रोन्सची खरेदी करणार असून ४ अब्ज डॉलरच्या या सौद्याला अमेरिकेने फेब्रुवारीतच मंजुरी दिली आहे. अमेरिका तसेच युरोपातील देशांशीही भारताचे संबंध दृढ होत चालले आहे. फ्रान्सकडूनही भारत राफेल फायटर विमाने आणि स्कॉर्पिन पाणबुड्या घेतो आहे. अब्जावधी डॉलर्सचे करार यासंदर्भात झाले आहेत.

चीनसोबत कसे संबंध राहणार ?

एक्झिट पोलचे निष्कर्ष जाहीर झाल्यावरच चीनच्या सरकारी मुखपत्राने भविष्यातही भारतासोबतचे संबंध चांगले राहतील असे नमूद करत मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाचे स्वागत केले होते. २०२० मध्ये दोन्ही देशांचे सैनिक परस्परांना भिडल्यानंतर त्यावेळी काही काळासाठी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. तणाव आणि दावेदारी असूनही आणि परस्परांकडे पाहुन डोळे वटारण्याचे काम होत असले तरी भारत आणि चीन व्यापारात सगळ्यांत मोठे भागिदार आहेत.

राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार दोन्ही देशांतील प्रतिकूल संबंध कायम राहतील व मित्रदेशांच्या सहकार्याने चीनच्या आक्रमकतेला लगाम घालण्याचे प्रयत्नही सुरू राहतील. दरम्यान, चीनच्या संदर्भात लवकरच एक आनंदाची बातमी कळू शकते असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच केले होते. त्यातून सीमा प्रश्‍नावर तोडगा निघण्याचे संकेत मिळाले. तसे झाले तर उभय देशांतील संबंध वेगाने सुधारण्यास मदत होऊ शकते.

भारत- रशिया संबंध

शीतयुध्दाच्या काळापासून भारत आणि रशियाचे संबंध आहेत. भारताला सगळ्यांत जास्त शस्त्रे देणाऱ्या देशांत रशिया अग्रस्थानी आहे. युक्रेनवरील आक्रमणाच्या मुद्द्यावरून रशियावर थेट टीका करण्याचे भारताने टाळले होते. संयुक्त राष्ट्रांतही रशियाच्या विरोधातील प्रस्तावांवर भारताची भूमिका रशियाला न दुखावण्याचीच राहीली. त्याबदल्यात रशियाने भारताला इंधानाचा भारतीय चलनात पुरवठाही केला होता. मोदींच्या निवडीचे रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतीन यांनीही स्वागत केले आहे. भविष्यात दोन्ही देशांचे संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहोचतील असे जाणकारांचे म्हणणे आहे.