Sangli Samachar

The Janshakti News

विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार मतमोजणी - जिल्हाधिकारी



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ जून २०२४
44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितेले, मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी, पोलीस व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेश लागू करण्यात आले आहेत.


टपाली मतपत्रिकेची मतमोजणी 20 टेबलवर, ETPBS मतमोजणीसाठी 20 टेबल आणि ईव्हीएमची मतमोजणी विधासभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर होणार आहे. यामध्ये २८१- मिरज विधानसभा मतदार संघातील ३०९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८२- सांगली विधानसभा मतदार संघातील ३०८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८५- पलूस कडेगांव विधानसभा मतदार संघातील २८५ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८६- खानापूर विधानसभा मतदार संघातील ३४८ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी, २८७- तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील २९९ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २२ फेऱ्यांमध्ये मतमोजणी आणि २८८- जत विधानसभा मतदार संघातील २८१ मतदान केंद्रावरील मतांची १४ टेबलवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.

ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी 6 विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 14 टेबलची मांडणी करण्यात आली असून प्रत्येक टेबलसाठी एक सुक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले. ETPBS च्या मतमोजणीसाठी 20 टेबलची मांडणी करण्यात आली असून त्यासाठी एकूण 2 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक व एक मतमोजणी सहाय्यकाची नियुक्ती केली आहे. तर टपाली मतपत्रिकेच्या 20 टेबलसाठी प्रत्येक टेबलसाठी एक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक व दोन मतमोजणी सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आतापर्यंत सैनिक मतदारांच्या 3 हजार 59 आणि टपाली 3 हजार 822 अशा एकूण 6 हजार 881 मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. मतमोजणीसाठी सुमारे 700 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे म्हणाले की, मतमोजणीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 750 होमगार्ड, 500 अंमलदार, 50 अधिकारी यासह मतमोजणी व अनुषंगिक बाबीसाठी सांगली जिल्हा पोलीस दलातील सुमारे 80 टक्के पोलीस दल बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहे. मतमोजणी व निवडणुकीच्या अनुषंगाने कोणीही समाज माध्यमांवर गैरसमज पसरवू नये. आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करू नये. विजयी उमेदवारास विजयी मिरवणूक काढता येणार नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.