Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत इमारतींच्या पार्किंग क्षेत्रावरही आकारला जाणार कर, प्रशासकीय महासभेत निर्णय| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ जून २०२४
महापालिका क्षेत्रातील सर्व इमारतींमधील पार्किंग क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या दराप्रमाणे मालमत्ता कर आकारणी होणार आहे. सोमवारी झालेल्या महापालिकेच्या प्रशासकीय महासभेत याबाबतचा ठराव करण्यात आला. यापुढे अनधिकृत पाणी कनेक्शन आढळल्यास वापराच्या प्रकारानुसार ७ हजार ५०० ते १ लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत सोमवारी प्रशासकीय महासभा पार पडली. अध्यक्षस्थानी आयुक्त शुभम गुप्ता होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, चंद्रकांत खोसे, उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, संजीव ओहोळ आदी अधिकारी उपस्थित होते. आतापर्यत महापालिका क्षेत्रात घर, अपार्टमेंट व अन्य व्यापारी संकुलांच्या इमारतींच्या पार्किंग क्षेत्राला मालमत्ता कर नव्हता. अर्पाटमेंटचे मालक ग्राहकांकडूनच देखभाल दुरुस्तीसाठी लाखोे रुपये वसूल करायचे. मात्र सदर जागेवर महापालिकेचा कोणताच कर नव्हता. मात्र आता यापुढे पार्किंग क्षेत्राला रिकाम्या प्लॉटच्या दराप्रमाणे मालमत्ता कर लागणार आहे. महापालिका क्षेत्रात मध्यंतरी अनधिकृत पाणी कनेक्शन आढळली. त्याचीही गंभीर दखल या बैठकीत घेण्यात आली आहे. अनधिकृत घरगुती वापराच्या पाणी कनेक्शनसाठी दंडाची रक्कम ३ हजार रुपयांवरून ७ हजार ५०० रुपये, व्यावसायिक वापराच्या कनेक्शनसाठी ५ हजार रुपयांवरून २० हजार रुपये, तर औद्योगिक वापराच्या कनेक्शनसाठी दंडाची रक्कम १ लाख रुपये केली आहे. तसा ठराव मंजूर करण्यात आला.


पाणी कनेक्शनसाठी जादा अनामत

पाणी कनेक्शनच्या अनामत रकमेत वाढ करण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. पाचशे चौरस फुट क्षेत्राच्या घराला पाणी जोडणीसाठी ७०० रुपये अनामत रक्कम होती. ती आता १ हजार रुपये केली आहे. पाचशे चौरस फुटापेक्षा जादा क्षेत्र असलेल्या घराच्या नळ कनेक्शन जोडणीसाठी प्रती चौरस फूट एक रुपये जादा आकारणी केली जाणार आहे. व्यावसायिक वापराच्या पाणी कनेक्शनसाठी अनामत रक्कम दोन हजार रुपयांवरून पाच हजार रुपये करण्यात आली आहे. निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.