Sangli Samachar

The Janshakti News

भारताला हादरवण्याचा होता कट, भाजप, RSS आणि हिंदू नेते टार्गेटवर, 4 दहशतवाद्यांचा मोठा डाव उधळला !



| सांगली समाचार वृत्त |
अहमदाबाद - दि. २१ मे २०२४
देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आज पार पडत आहे. असं असताना अहमदाबाद विमानतळावर 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यात एटीएसला यश आलं आहे. या दहशतवाद्यांचा देशात मोठा घातपात घडवण्याचा डाव होता. विशेष म्हणजे या दहशतवाद्यांना भाजप, आरएसएसच्या नेत्यांसह हिंदू नेत्यांच्या टार्गेट किलिंगचं टास्क देण्यात आलं होतं. चारही अतिरेकी हे श्रीलंकेचे नागरीक आहेत, अशी माहिती समोर आली आहे. ते श्रीलंकेतून चेन्नई येथे आले होते. त्यानंतर ते चेन्नाई येथून अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले होते. पण त्यांची अहमदाबादमध्ये डाळ शिजली नाही. कारण अहमदाबादमध्ये येताच गुजरात एटीएसने चारही दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांजवळ पाकिस्तान निर्मित शस्त्र सापडले आहेत.

मोहम्मद नुसरथ, मोहम्मद नफरान, मोहम्मद फारिस आणि मोहम्मद रासदीन अशी या चारही दहशतवाद्यांची नावे आहेत. पोलीस उपमहानिरीक्षक विकास सहाय यांनी याबाबत माहिती दिली आहे. “चारही दहशतवादी हे श्रीलंकेचे मूल निवासी आहेत. ते इस्लामिक स्टेटच्या विचारधारेचे कट्टरपंथी आहेत. ते केवळ तमिळ भाषेत बोलतात. त्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा समजत नाही. चैन्नई येथून अहमदाबाद आल्यानंतर चारही अतिरेकी हे पाकिस्तानच्या हँडलरच्या मेसेजचे वाट पाहत होते. त्यांना अहमदाबाद येथून टार्गेट लोकेशनला पोहोचायचं होतं. तिथे त्यांना शस्त्र मिळणार होतं. पण त्याआधीच एटीएसने त्यांना अटक केली”, अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विकास सहाय यांनी दिली.


दहशतवाद्यांना ज्यूंवर हल्ला करण्याचा टास्क

चारही अतिरेक्यांना ज्यूंच्या प्रमुख स्थळांवर हल्ला करण्याचा टास्क देण्यात आला होता. तसेच भाजप, आरएसएस आणि त्याचबरोबर हिंदू नेत्यांच्या टार्गेट किलिंगचा प्लॅन होता. या दहशतवाद्यांना हँडलरचा निर्देश मिळाले असते तर ते देशात मोठा घातपातही घडवून आणण्याच्या तयारीत होते. दहशतवाद्यांचा सूत्रधार पाकिस्तानात आहे. विशेष म्हणजे अटकेतील एका आरोपीने पाकिस्तानचा विजादेखील घेतला आहे. गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांसह इतक केंद्रीय यंत्रणादेखील या दहशतवाद्यांची चौकशी करत आहेत. कारण या एजन्सीजला संशय आहे की, आरोपींचे धागेदोरे हे भारतातील काही जणांशी जोडले असू शकतात.

विशेष म्हणजे आयसिसच्या इंडिया चीफला काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. या चीफसह त्याच्या सहकाऱ्यालाही अटक करण्यात आली होती. हे दोघेही आरोपी बांगलादेशाची सीमा पार करत भारतात घुसले होते. दोघांना आसामच्या धुबरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. आरोपी भारतात टेरर फंडींगचं आणि आयएसआयएसमध्ये भरती करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने आले होते, अशी माहिती तपासातून समोर आली होती.