Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीचा चेहरा बदलताना...एखादी व्यक्ती असो, कुटुंब असो, समाज असो किंवा या सर्वांना सामावून घेणारे शहर असो. प्रत्येकाची स्वतःची एक ओळख असते. 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' असे म्हणत असताना त्याचे प्रतिबिंब समाजावर वा शहरावर पडत असते. या प्रतिबिंबावरच त्या त्या घटकाची संस्कृती दर्शवत असते. बदलणाऱ्या काळ वेळेनुसार स्वतःत बदल घडवत असताना कळत नकळत आपल्या आजूबाजूच्या समाज घटकाचा आपल्यावर परिणाम होत असतो. त्यानुसार एखाद्याचे वर्तन घडते-बिघडते. आपण ज्या घटकाशी एकरूप होतो, त्याचा प्रभाव आपल्यावर कसा पडतो, आपण तो कसा स्वीकारतो यावर हे अवलंबून असते.

सध्या सांगलीची ओळख-संस्कृती अशाच रीतीने घडताना-बिघडताना पाहावे लागणे यासारखे दुर्दैव नाही. काल विश्रामबाग मधील एका कॅफे हाऊस मध्ये जो प्रकार घडला, तो या बदलणाऱ्या सांगलीचे प्रतिबिंब दर्शवतो. ही एकच घटना नव्हे, काही दिवसापूर्वी सांगली व परिसरात एमडी ड्रगचे जे रॅकेट उघडकीस आले, ते कशाचे द्योतक म्हणायचे ? 'शितावरून भाताची परीक्षा होते' असे म्हणतात. अर्थात काही व्यक्ती व घटना यावरून हा नियम सर्वांना लागू होतो, असे म्हणता येणार नाही. हे जरी खरे असले तरी त्याचे प्रमाण मात्र चिंताजनक आहे, हे कोणीही नाकबूल करणार नाही.

सांगली शहराची जी ओळख, जी प्रतिमा होती व आहे, त्याला अशा घटनांनी डाग लागू शकतो. नव्हे तर लागताना दिसत आहे. हा डाग का लागतो आहे, याला जबाबदार कोण ? त्या व्यक्ती... त्या व्यक्तीचे कुटुंब... की मग उघड्या डोळ्यांनी या घटना पाहणारा समाज ? मग अशा घटना घडू नये म्हणून ज्या संघटना प्रामाणिकपणे काम करीत असतात, त्याला दोष द्यायचा का ? अर्थात अशा घटना रोखण्यासाठी कोणीही कायदा हातात घेऊ नये, हे जरी खरी असले. तर मग कायद्याचा धाक अशा डाग लावणाऱ्या व्यक्तींना आहे का ? हा प्रश्न उभा राहतो. अलीकडील तरुणाईला खरे तर कोणाचाच धाक राहिलेला नाही, हा आरोप चुकीचा म्हणता येईल का ? याचे उत्तर शोधण्याची वेळ आली आहे. आणि ती वेळ निघून जाण्यापूर्वी याच शहरातील सुसंस्कृत म्हणविणाऱ्या घटकांनी आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र यायला हवे.

गेल्या काही दिवसात किंवा वर्षात गुन्हेगारीत पकडल्या गेलेल्या संशयितांचे वय पाहता, गुन्हेगारी तरुणाईकडून अल्पवयीनांकडे वळताना दिसत आहे. आणि हीच बदलणाऱ्या सांगलीसाठी धोकादायक आहे. सांगलीला गुन्हेगारीचा धोका नवा नाही. पण तो इतक्या धोकादायक वळणावर नव्हता. कदाचित म्हणूनच त्याकडे झालेले दुर्लक्ष या शहराला कडेलोटाकडे घेऊन जाताना दिसत आहे. आणि हा कडेलोट होऊ नये, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात, हेच या निमित्ताने अपेक्षित.