Sangli Samachar

The Janshakti News

भारतीय वनसेवा परीक्षेत मराठी टक्का वाढला; महाराष्ट्राच्या प्रतीक्षा काळे देशात दुसऱ्या स्थानी !| सांगली समाचार वृत्त |
नागपूर - दि. ९ मे २०२४
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या भारतीय वनसेवा परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात महाराष्ट्रातील प्रतीक्षा काळे या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.
विशेष म्हणजे, भारतीय वनसेवा परीक्षेत मराठी टक्कादेखील वाढला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने बुधवारी निकाल जाहीर केला. यात एकूण १४७ उमेदवारांची भारतीय वनसेवेतील पदांवर विविध श्रेणींमध्ये नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या नियुक्त्या उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार केल्या जातील. काही वर्षांपूर्वीपर्यंत या परीक्षेत मराठी टक्का फार कमी होता. मात्र, अलीकडच्या काही वर्षात हा टक्का वाढत आहे. यावर्षी पहिल्या पाचमध्येच दोन मराठी महिलांचा समावेश आहे.


एकूण उमेदवारांमध्येही मराठी उमेदवारांची संख्या वाढली आहे. या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रतीक्षा काळे या मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील सिपना वन्यजीव विभागात सहाय्यक वनसंरक्षक म्हणून आहेत.

वनखात्यातील वरिष्ठांनी केलेले सहकार्य, स्वयम अध्ययन, वेळेचे नियोजन यातून हे यश प्राप्त करता आले. देशात दुसरी आल्याचा अभिमान तर आहेच, पण महाराष्ट्राला हा बहूमान मिळाला याचा जास्त अभिमान आहे. संधी मिळाली तर जागतिक पातळीवर काम करण्याची इच्छा आहे.

प्रतीक्षा काळे, 

भारतीय वनसेवा अधिकारी.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही व्हॉट्सअप समूहाच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन घेत आहोत. प्रामुख्याने मुलाखतींसाठी आम्ही ही तयारी करुन घेतो. यावेळी १२० विद्यार्थ्यांची तयारी केली. प्रत्येक विद्यार्थ्याला भरपूर वेळ देता आला. भारतीय वनसेवेत मराठी टक्का वाढत आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे.

-महेश भागवत, 

अतिरिक्त पोलीस महासंचालक, 

रेल्वे आणि रस्ता सुरक्षा, तेलंगणा.