| सांगली समाचार वृत्त |
हातकणंगले - दि. ९ मे २०२४
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीसोबत तह करण्याचा निर्णय मागे घेतला. तडजोडीत त्यांचा रुसवा कोणीही काढू शकले नाहीत. अखेर महाविकास आघाडीमधून उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. राजू शेट्टी यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे ही लढत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांमध्ये थेट होण्याऐवजी तिरंगी झाली.
लोकसभा निवडणुकीची चाहूल लागण्याअगोदरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली होती. ऊस दराच्या निमित्ताने उत्पादकांची ताकद पुन्हा एकवटण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत असतानाच २०२४ च्या लोकसभेचे बिगुल वाजले. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्यासोबत तह करण्याचे निश्चित केले होते. शेट्टी यांनी महाविकास आघाडी सोबत जाण्याऐवजी केवळ पाठिंब्याची भूमिका घेतली. तसेच, उद्धवसेनेचे मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यांची धरसोडीची भूमिका पाहून उद्धव ठाकरे यांनी सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.
मुख्यमंत्र्यांनी ठोकला तळ
प्रारंभीच्या टप्प्यात राजू शेट्टी यांची चांगलीच हवा होती. त्यानंतर उद्धवसेनेचे उमेदवार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशेषत: भाजप आणि शिंदेसेनेमध्ये अस्वस्थता पसरली. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच हातकणंगलेत आपले लक्ष्य केंद्रित केले आणि राजकीय हवा पलटली. त्यामुळेच मतदान चुरशीने झाले. तीनही उमेदवार आपणच बाजी मारणार, असा दावा करीत आहेत.