Sangli Samachar

The Janshakti News

संजय पाटील, विशाल पाटील यांच्यात विजयाचा तराजू दोलायमान; विलासराव भूमिका महत्त्वाची !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ मे २०२४
सांगली लोकसभा निवडणुकीसाठी जत तालुक्याचे निर्णायक मतदान मानले जाते. सुरवातीला तिरंगी लढतीचे चित्र असणारी ही निवडणूक. जत तालुक्यात मात्र दुरंगी लढतीत महायुतीचे संजय पाटील, अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात विजयाचा तराजू  दोलायमान होत असताना दिसत आहे, मात्र येथे माजी आमदार विलासराव जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदान तयार ठेवण्याच्या दृष्टीने नव्याने आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय, भाजपला रामराम ठोकून अपक्ष उमेदवार विशाल यांना पाठिंबा देणारे विलासराव हे यंदा 'किंगमेकर'ची भूमिका पार पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


माजी आमदार विलासराव जगताप, खासदार संजय पाटील यांच्यात पडलेली वादाची ठिणगी व यातून जगताप यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करून तडकाफडकी दिलेला राजीनामा ही भाजप अंतर्गत जतमधून पडलेली पहिली ठिणगी होती. यातून पुन्हा एकदा विलासराव जगताप यांनी दुष्काळी फोरमच्या माध्यमातून निवडणुकीत बंड पुकारले. याला कवठेमहांकाळच्या अजितराव घोरपडे यांची साथ मिळाली. दुसरीकडे, काँग्रेसच्या हक्काच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेने केलेला दावा यातून विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा स्वीकारल्याने त्यांना जत व कवठेमहांकाळमधून मोठी ताकद मिळाली.

दरम्यान, खासदार संजय पाटील यांनी म्हैसाळ विस्तारित योजनेला दिलेल्या बळाच्या जोरावर आणि दुसऱ्या फळीतील प्रकाश जमदाडे, डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगौडा रविपाटील या नेत्यांना सोबत घेऊन जत तालुक्यात लोकसभेला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य दाखविले. मात्र, जिल्ह्यात शिजलेल्या राजकारणाची झळ जत तालुक्यापर्यंतही पोहोचली. यामध्ये नेते एका व्यासपीठावर, तर सर्वसामान्य कार्यकर्ते एका बाजूला, अशी परिस्थिती निर्माण झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी ही निवडणूक भावनिकतेच्या जोरावर लढविली. यात त्यांनी जत तालुक्यातील जनतेमध्ये आपला विश्वास निर्माण करण्यात काहीसे यश मिळाले.

मात्र, खासदार संजय पाटील यांनी यंदाचा हा दुष्काळ जतच्या वाट्याचा शेवटचा असेल, असा ठोस आत्मविश्वास बाळगत दुष्काळी जनतेच्या भावनांशी संवाद साधला. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा करिष्मा या निवडणुकीत नवखा होता. त्यांचा जतच्या जनतेवर किती परिणाम झाला ? या सगळ्याचा सोक्षमोक्ष येणाऱ्या ४ जून रोजी मतपेट्यामधून स्पष्ट होणार असून खासदार संजय पाटील व विशाल पाटील यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत जत तालुका कोणाच्या बाजूने झुकते माप देणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.