Sangli Samachar

The Janshakti News

पंतप्रधानांचा उत्तराधिकारी कोण? स्वत:च मोदींनी दिले उत्तर !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १३ मे २०२४
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पतप्रधान करण्यासाठी मतं मागत असल्याचा आरोप केला. कारण पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस असून 75 वर्षांवरील व्यक्ती निवृत्त होतील असा नियम त्यांनी केला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शहांसाठी मत मागत असा दावा केजरीवालांनी केला. पण असं असलं तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खरा उत्तराधिकारी कोण असणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च उत्तर दिले आहे. (who are heir of pm modi pm narendra modi west bengal election rally tells)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी पश्चिम बंगालमधील हुगळी प्रचार सभा झाली. या सभेत भाष्य करताना नरेंद्र मोदींनी त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार यावर उत्तर दिले. त्यानुसार, "पंतप्रधान मोदींचा वारस कोण? तुम्ही देशवासी आहात. तुम्ही माझे कुटुंब आहात. तुमच्याशिवाय या जगात माझे काहीही नाही. साधारणपणे, आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला काहीतरी देण्याची इच्छा असते. पण, तुम्ही सर्व देशवासी आहात, मोदींचे वारसदार आहात. तुम्ही माझे कुटुंब आहात आणि तुम्ही माझे वारस आहात. ज्याप्रमाणे कुटुंबप्रमुखाला आपल्या मुलांसाठी काहीतरी सोडावेसे वाटते, त्याचप्रमाणे मलाही विकसित भारत मागे सोडायचा आहे", असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


राम मंदिरावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "राम मंदिर बांधल्यापासून त्यांची झोप उडाली आहे. या लोकांनी राम मंदिरावरही बहिष्कार टाकला. जो पक्ष आई, माती, मानवच्या गप्पा मारतो. तो आज व्होटबँकेसाठी बंगालचा अपमान करत आहे. तिथल्या वारशाचाही अपमान करत आहे", असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. त्याचप्रमाणे "तृणमूल काँग्रेसने बंगालच्या तरुणांचा विश्वासघात केला आहे. तृणमूलने बंगालच्या तरुणांचे भविष्य विकले, पालकांची स्वप्ने विकली आहेत. शिवाय, पेपर लीक आणि नोकरभरती माफियांनी सगळ्यांना उद्ध्वस्त केले. त्यांचे बडे नेते, मंत्री तुरुंगात आहेत", अशी टीका तृणमूल काँग्रेसवर टीका केली.

"निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत, उद्या चौथ्या टप्प्यातील निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या तीन टप्प्यांनंतर मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की भाजप आणि एनडीए 400 चा आकडा पार करतील", असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, केजरीवालांच्या आरोपांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "मी अरविंद केजरीवाल आणि कंपनीला सांगू इच्छितो की मोदीजी 75 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला आनंदी होण्याची गरज नाही. ते पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असे भाजपच्या घटनेत कुठेही लिहिलेले नाही. ते पंतप्रधान होतील आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील", अशा शब्दांत अमित शहांनी प्रत्युत्तर दिले.