Sangli Samachar

The Janshakti News

भारत आता जपानलाही मागे टाकणार; पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार !| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १३ मे २०२४

भारत जगातील चौथ्या क्रमांकाची सगळ्यांत मोठी अर्थव्यवस्था होणार असून पुढील वर्षी आपण जपानलाही क्रमवारीत मागे टाकू असे जी २० चे शेर्पा आणि नीती आयोगाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. सध्या भारत जगातली पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असून अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान हे चार देश भारताच्या पुढे आहेत.

मात्र आता पुढच्या वर्षी आपण जपानला मागे टाकत चौथ्या स्थानावर पोहोचू असे कांत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दशकभरापूर्वी पाच दुबळ्या अर्थव्यवस्थांमधून पाच सशक्त अर्थव्यवस्थांत समावेश होण्यापर्यंतच्या प्रवासाची काही ठळक माहितीही कांत यांनी दिली.

२.१ लाख कोटींचे विक्रमी जीएसटी कलेक्शन, गेल्या तीन तिमाहींत ८ टक्के विकास, २७ देशांसोबत भारताच्या रूपयात आर्थिक व्यवहार, पोलाद, सिमेंट आणि ऑटोमोबाइल क्षेत्रात दोन अंकी वाढ, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जगाचे नेतृत्व आदींचा उल्लेख करत भारताच्या विकासाच्या अनेक उपलब्धींचा कांत यांनी उल्लेख केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने आपल्या भाषणांमध्ये भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल असा दावा करत आहेत. तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार सरकार कोणाचेही असले तरी देश हा टप्पा गाठणारच आहे. मोदी त्याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.२०२७-२०२८ पर्यंत भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था असेल असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही म्हटले असल्याचे बीबीसीने आपल्या एका बातमीत अलिकडेच म्हटले आहे. आता अमिताभ कांत यांचे हे विधान त्याच भविष्यवाणीचा भाग मानले जाते आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचेच त्यातून सूचित होते आहे.