Sangli Samachar

The Janshakti News

जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा !| सांगली समाचार वृत्त |
जत - दि. २४ मे २०२४
जत तालुक्यात अपुरी पर्जन्यवृष्टी, वाढती उष्णता यामुळे पाण्याची पातळी ९०० ते ११०० फुटापर्यंत खाली गेली. त्यामुळे दुष्काळाची तीव्रता व दाहकता वाढली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. सर्व वाड्या-वस्त्यांवर टँकरने पुरेसा पाणीपुरवठा केव्हा होणार? दुष्काळी जनतेची होरपळ कधी संपणार, असा चिंताजनक प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात जत तालुका विस्ताराने सर्वात मोठा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ३ लाख २५ हजार ६३० इतकी आहे. गावांची संख्या ११६ इतकी आहे. निसर्गाच्या अवकृपेने तालुका कायम दुष्काळग्रस्त राहिला आहे. गेल्या वर्षी अल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा अत्यल्प ८०.३ मि.मी. पाऊस झाला. सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान आहे. वाढत्या उष्णतेने पाण्याचे स्रोत आटले आहेत. भूजल पातळी तीन मीटरने घटली. विहिरी, तलाव, बंधारे व कूपनलिका कोरड्या पडल्या.

७३ गावांसाठी ९३ टँकर..

सध्या ७३ गावे त्याखालील ५३३ वाड्या-वस्त्यांवरील १ लाख ७२ हजार ८८६ लोकांना ९३ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. माणसी २० लिटरप्रमाणे वाटप सुरू आहे. जनावरांच्या पाण्याचा, वाढीव लोकसंख्येचा समावेश नाही. अंतर जास्त असल्याने वाढीव खेपा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे पाणी टंचाईने जनतेची होरपळ सुरू आहे.


नगारटेक जल योजनेची प्रतिक्षा..

उटगी दोड्डीनाला मध्यम प्रकल्पात डिसेंबर महिन्यात म्हैसाळ योजनेचे माडग्याळ ओढ्यातून पाणी सोडले होते. दोड्डीनाल्यातून ५१ गावे व त्याखालील वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. प्रकल्प नवसंजीवनी ठरला आहे. तालुक्यातील ७५ गावांना बिरनाळ तलावातून नगारटेक जल योजनेचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्रस्ताव आहे. सायफन पद्धतीने पाणी पोहोचू शकते. सर्व्हे करून आराखडा, अंदाजपत्रक तयार आहे. ही योजना राबविल्यास पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची आशा नागरिकांना वाटत आहे.

शिरपूर पॅटर्नची आवश्यकता..

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याने लोकसहभागातून पाणी आडवा पाणी जिरवा, वसंत बंधारा, कोल्हापूर बंधारा, गावतलाव, पाझर तलाव, नालाबल्डिंग आदी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करून तालुका टँकरमुक्त केला आहे. जत तालुक्यात शिरपूर पॅटर्न राबविण्याची गरज आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

पाणी योजनांचे तीनतेरा..

राष्ट्रीय पेयजल, भारत निर्माण, जलस्वराज्य योजनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून पाणी योजना झाल्या. तरीही गावे टँकरच्याच प्रतीक्षेत आहेत. काही गावांची पाणी योजनांची कामे चांगली झाली, अनेक गावात निधीचा गैरवापर झाल्यामुळे कामे अपूर्ण राहिली. योजना कुचकामी ठरल्या.

पाणी टंचाईवर दृष्टिक्षेप :

टँकरने पाणीपुरवठा गावे : ७३
वाड्या-वस्त्या : ५३३
शासकीय टँकर : ६, खाजगी टँकर : ८७
मंजूर खेपा : २१९, प्रत्यक्ष खेपा : २००
बाधित लोकसंख्या : १ लाख ७२ हजार ८८६