Sangli Samachar

The Janshakti News

अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी 517 मीटर पर्यंत स्थिर ठेवण्याचा निर्णय, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ मे २०२४
आगामी पावसाळ्यात 106% पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने सांगली कोल्हापूर भागातील कृष्णा पंचगंगा सह इतर नद्यांच्या तीरावरील गावांच्या नागरिकांची धाकधूक वाढली आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यास या दोन्ही जिल्ह्यातील नद्यांना महापुरास कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहते.

याच पार्श्वभूमीवर अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी मर्यादित ठेवण्यात येईल, असा निर्णय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नद्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्यात कारणीभूत असलेल्या अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१७.५० मीटर पर्यंत मर्यादित ठेवण्यात येणार आहे. 

काल दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे ऑनलाईन बैठक संपन्न झाली. सांगली पाटबंधारे जलसंपादन विभागाच्या वतीने महापूर नियंत्रणाबाबत आंतरराज्य बैठकीचे नियोजन करण्यात आले होती. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती बाबत दोन्ही राज्यांच्या पाटबंधारे जलसंपदा अधिकाऱ्यांमध्ये परस्पर समन्वय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१७ मीटर पेक्षा जास्त झाल्यास दोन्ही जिल्ह्यातील पूर परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे हे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचे आश्वासन कर्नाटकाच्या पाटबंधारे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने दिले. मात्र आवश्यकता भासल्यास ५१७.५० मीटर पेक्षा अधिक पाणी पातळी ठेवायची झाल्यास त्याची कल्पना महाराष्ट्रातील पाटबंधारे जलसंपदा विभागास दिली जाईल, त्यानंतरच पाणी पातळी वाढवली जाईल. कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय पाणी पातळी वाढविली जाणार नाही, असे अलमट्टी धरणाच्या मुख्य अभियंत्यानी स्पष्ट केले.

या बैठकीला सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कोयना धरणाचे अधीक्षक अभियंता नितेश पोतदार, कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता स्मिता माने सांगलीच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर आदींसह जलसंपदा विभागाचे दोन्ही राज्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

२०१९ च्या महापुरात होत्याचे नव्हते झालेल्या नागरिकांचे मनस्थिती व नुकसान लक्षात घेऊन दोन्ही राज्यातील पाटबंधारे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्परांशी योग्य समन्वय साधल्यामुळे तदनंतर महापुराचा धोका कमी झाला आहे. यंदाही पाऊसमान प्रमाणापेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने, दोन्ही राज्यातील पाटबंधारे जलसंपदा अधिकाऱ्यांनी योग्य तो समन्वय राखण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.