Sangli Samachar

The Janshakti News

चूक कर्नाटक पाटबंधा-याची; कृष्णेचे पाणी राखण्याची जबाबदारी आली महाराष्ट्र पोलिसांवर !



| सांगली समाचार वृत्त |
शिरोळ - दि. २४ मे २०२४
कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकच्या हद्दीत पाणी सोडल्याची माहिती आणि व्हिडिओ आज बेळगाव प्रशासनाकडून व्हायरल झाला आणि बेळगावसह सांगली जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला. राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडलेच नाही, असे सांगत सांगली पाटबंधारे विभाग अलर्ट मोडवर आला. त्यांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधत तातडीने राजापूर बंधाऱ्यावर पोलिस बंदोबस्त तैनात केला. कोयना धरणात पाणी साठा मर्यादित असल्याने आणि कर्नाटक हद्दीतून राजापूर बंधाऱ्याशी छेडछाड केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन कृष्णा नदीच्या पाण्याला पोलिस संरक्षण देण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली.

गेल्या आठवड्यात कर्नाटकला पाणी दिले होते. ते पाणी कृष्णा नदीतून प्रवाहित झाले; पण आज पुन्हा राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकाला पाणी सोडले आहे, अशी माहिती आणि व्हिडिओ बेळगाव प्रशासनाने प्रसिद्ध केला. याबाबत सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याकडे विचारणा केली असता गुरुवारी राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली. त्यावर मग बेळगाव जिल्ह्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता 'चुकून जुना व्हिडिओ आणि माहिती पाठवली गेली', अशी कबुली देण्यात आली. त्या व्हिडिओबाबत खातरजमा केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने तो व्हिडिओ डिलीट करण्यात आला.


दरवर्षी उन्हाळ्यात कर्नाटककडून महाराष्ट्राकडे पाण्याची मागणी केली जाते. यंदा लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही बेळगाव जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांशी संपर्क साधून पाण्याची मागणी केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात महाराष्ट्राकडून पाणी सोडण्यात आले होते. ते पाणी कर्नाटकातील कृष्णा नदीच्या पात्रात पोहोचल्यानंतर शेतकरी तसेच नदीकाठावरील नागरिकांकडून समाधान व्यक्‍त करण्यात आले. पण, राजापूर बंधाऱ्यातून महाराष्ट्राने पाणी सोडल्याचा व्हिडिओ गुरुवारी व्हायरल झाल्यामुळे पुन्हा पाणी सोडण्यात आले का? असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. पण, कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून गेल्या आठवड्यातील व्हिडिओ गुरुवारी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. तो व्हिडिओ जुना असल्याचा खुलासा नंतर संबंधित अधिकाऱ्याला करावा लागला. महाराष्ट्राने पाणी सोडल्यानंतर बेळगाव जिल्ह्यात त्यावरून श्रेयवाद सुरू झाला होता. महाराष्ट्रातून पाणी सोडले जावे, यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे पाणी आल्यानंतर दोन्ही पक्षांकडून त्याचे श्रेय घेण्यात आले.

खातरजमा न केल्याने संभ्रम

श्रेयवादातूनच पाणी सोडल्याचा जुना व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या व्हिडिओची खातरजमा न केल्याने संभ्रम निर्माण झाला व तो संभ्रम दूर करण्याची वेळ त्यांच्यावर आली.