Sangli Samachar

The Janshakti News

मोठ्ठ्या पवारांचा ठाकरे, काँग्रेसला बोलता बोलता इशारा !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ मे २०२४
राजकारण म्हटले की तडजोड करावी लागते. अनेकदा हट्ट धरला तर नुकसानही होते. युती आणि आघाडीत जागावाटपावरून कोणी एक पाऊल मागे टाकले कोणी पुढे, तिढा काही शेवटपर्यंत सुटला नव्हता. लोकसभेला तर ४८ जागा होत्या. काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक येऊ घातली आहे. यावेळी २८८ जागा आहेत, यामुळे हा तिढा तर एखादेवेळी युती-आघाडीतही मोठी फूट पाडण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीत जादाच्या जागा जिंकून आणण्याची कुवत असतानाही कमी जागा घेतल्या विधानसभेला तसे होणार नाही असे स्पष्ट संकेत ठाकरे आणि काँग्रेसला देऊन टाकले आहेत. 

भाजपला २७२ चा आकडा गाठता आला नाहीतर...; पाठिंब्याच्या चर्चांवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे महाविकास आघाडीचे जागावाटप अखेरपर्यंत लांबले होते. वंतिचने स्वतंत्र लढण्याची घोषणा केल्यावर उद्धव ठाकरे गट २१, काँग्रेस १७ आणि शरद पवार राष्ट्रवादी १० जागा लढविणार हे स्पष्ट झाले होते. जागावाटपात ठाकरे गट वरचढ ठरला होता. त्यांनी काँग्रेसच्या सांगलीच्या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर करून ही जागाही बळकावली होती. तर मुंबईतील हरणाऱ्या जागा काँग्रेसला सोडल्याचा आरोप झाला होता. अशात शरद पवारांनी आपला सेफ गेम खेळत १० जागा लढविण्याची तयारी केली होती. 


लोकसभा निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे देखील भाजपासोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत, असे पवारांनी छातीठोकपणे सांगितले आहे. पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यामध्ये पवारांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

आता शरद पवारांनी या जागा आणि कुवतीपेक्षा कमीच घेतल्याचा दावा केला आहे. विधानसभेलाही महाविकास आघाडीने एकत्रच लढावे असे मला वाटत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. लोकसभेला 48 जागाच होत्या, माझा पक्ष जरी छोटा होता असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष होता. तरीही आम्ही कमी जागा घेतल्या. जास्त जागा घेऊन त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती. परंतु आपण तिघे एकत्र यायचे त्यामुळे सामंजस्य राखले जायला हवे होते, ते आम्ही पाळल्याचे पवारांनी स्पष्ट केले. तसेच विधानसभेला २८८ जागा आहेत, एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल, असे सांगत यावेळी राष्ट्रवादी कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला दिला आहे.