Sangli Samachar

The Janshakti News

उन्हाळा संपेपर्यंत जिल्ह्याला पाणी कमी करून देणार नाही - खा. संजय काका पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ मे २०२४
उन्हाळा संपेपर्यंत जनतेला पाणी कमी पडू देणार नाही असा ठाम विश्वास खा. संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपन्न झाल्यानंतर प्रथमच संजय काकांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना संजय काका म्हणाले की, आपण नगर आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर गेलो असल्यामुळे आपण जिल्ह्यात उपस्थित नव्हतो. असा खुलासा खा. संजय काका पाटील यांनी केला.

सध्या सांगली जिल्हा दुष्काळाची दाहकता वाढत चाललेली आहे. पाण्याचे टँकर, त्याची सुलभता, जनतेची पाण्याची मागणी यावर जिल्ह्यातील सर्व प्रांतांशी माझे बोलणे झाले आहे. मागच्या वर्षी पाऊसमान कमी असल्यामुळे यंदा धरणामध्ये पाण्याचा साठा कमी झाला. तरीही आपण वीज निर्मिती योजनेतून 12 टीएमसी पाणी मागितलेले आहे, पैकी ८ टीएमसी पाणी देण्याबाबतची मंजुरीचे पत्र प्रशासनाला मिळालेले आहे तर उर्वरित ४ टीएमसी बाबत प्रोसेस सुरू आहे. हे पाणी देण्याबाबत यंत्रणेने मान्य केले आहे. जोपर्यंत जिल्ह्याला पाण्याची आवश्यकता आहे तोपर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


त्यामुळे टेंभू, ताकारी आणि म्हैशाळ या योजनेसाठी जे पाणी कमी पडणार होते, ते पाणी हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडून देणार नाही याची हमी देवेंद्रभाऊंनी दिली आहे, असे खा. संजय काका पाटील यांनी सांगितले.

दुष्काळी भागातील नागरिकांसाठी प्रशासनाकडून टँकर बाबत आलेले प्रस्ताव मान्य करण्यात येतील असे आश्वासनही यावेळी खा. संजय काका यांनी दिले. या पत्रकार परिषदेसाठी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.