Sangli Samachar

The Janshakti News

ममतांकडून 'इंडिया आघाडी'ला दिलासा; पण...| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १६ मे २०२४
पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्याशी असलेल्या वादातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात कोणत्याही पक्षाशी आघाडी केली नाही. इंडिया आघाडीसाठी आग्रही असलेल्या ममताच आघाडीत नसल्याने त्या बाहेर पडल्याची चर्चा होती. पण त्यांनी पुन्हा एकदा आपण अजूनही आघाडीसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीनंतरच्या आघाडीबाबतही मोठा दिलासा दिला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपला केवळ आपणच हरवू शकतो, असे म्हणत ममतांनी आघाडीसोबत जागावाटप केले नाही. त्यांनी सुरूवातीला काँग्रेसला दोन ते चार जागांची ऑफर दिली होती. पण काँग्रेसने ही ऑफर मान्य केली नाही. तर दुसरीकडे ममता आणि अधीर रंजन चौधरी तसेच डाव्या पक्षांचे कधीच पटले नाही. त्यामुळेही ममतांनी काँग्रेसला साथ दिली नाही.


लोकसभा निवडणुकीच्या चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर ममतांनी आघाडीला दिलासा दिला आहे. मोदी सरकारचा पराभव होऊन इंडिया आघाडीचे (India Alliance) सरकार बनणार असेल तर आपण बाहेरून पाठिंबा देऊ, असे ममतांनी जाहीर केले आहे. आम्ही केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर बंगालमधील माता-भगिनींना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असेही ममता म्हणाल्या आहेत.

एकीकडे आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर करताना ममतांनी बंगालबाबत मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. ममतांनी आघाडीतून सीपीएम आणि बंगाल काँग्रेसला वगळले आहे. राज्यात काँग्रेस आणि सीपीएमची आघाडी आहे. हे दोघे भाजपसोबत असल्याने त्यांना इंडिया आघाडीत मोजू नका. मी दिल्लीबाबत बोलत असल्याचे ममतांनी स्पष्ट केले.

देशातील जवळपास 70 टक्के जागांवरील मतदान पुर्ण झाल्यानंतर ममतांचे हे विधान आले आहे. अजूनही तीन टप्प्यांतून निवडणूक बाकी आहे. बंगालमध्ये प्रत्येक टप्प्यात मतदान होत आहे. राज्यात लोकसभेच्या 42 जागा असून भाजपने अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे. तर दुसरीकडे ममतांची तृणमूल काँग्रेसचे आव्हान भाजपसमोर आहे. काही मतदारसंघात काँग्रेस आणि सीपीएमनेही ममतांसमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे.