Sangli Samachar

The Janshakti News

रेल्वेस्थानक उडवण्याची धमकी देणाऱ्यास अटक; सांगली शहर पोलिसांची मुंबईत कारवाई



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ मे २०२४
येथील रेल्वे स्थानक बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या सचिन मारूती शिंदे उर्फ माधव किसन भिसे (वय ३५, रा. तरटगाव ता. फलटण, जि. सातारा, मूळ रा. गोपेवाडी, ता. पुसद, जि. यवतमाळ) याला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. गुन्हेशाखा लोहमार्ग मुंबई यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेतले. संशयित हा कौटुंबिक त्रासाने वैफल्यग्रस्त असून या त्रासातूनच कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अधिक माहिती अशी, सचिन शिंदे उर्फ माधव भिसे याने दि. १३ रोजी सांगली शहर पोलिस ठाण्यात दूरध्वनी करून पाकिस्तानातून रियाज कसाब बोलतोय. सांगलीत आलो असून रेल्वे स्थानक बॉम्बने उडवणार असल्याची धमकी दिली. या धमकीच्या फोननंतर पोलिस दल खडबडून जागे झाले. सांगली व मिरज रेल्वे स्थानकावर बॉम्बशोधक पथकासह पोलिस धावले. उशिरापर्यंत शोध मोहिम राबवली. अखेर खोडसाळपणाने हा फोन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तथाकथित रियाज कसाब याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी, धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांनी स्वतंत्र तपास पथक बनवून शोधासाठी रवाना केले.


पोलिस उपनिरीक्षक विक्रम चव्हाण व पथकाने पुणे व मुंबई येथे तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला. गुन्हे शाखा लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सचिन शिंदे उर्फ माधव भिसे याला मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने सांगली, पुणे, नागपूर व मुंबई येथे पोलिसांना फोन करून दहशतवादी बोलतोय असे सांगून रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी दिल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरूद्ध चोरीसारखे गुन्हे दाखल असून तो कारागृहात देखील जाऊन आला आहे.

वैफल्यातून कृत्य केले !

संशयित सचिन शिंदे उर्फ माधव भिसे हा कौटुंबिक त्रासाने वैफल्यग्रस्त झाला आहे. या त्रासातूनच धमकी देण्याचे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले आहे.