Sangli Samachar

The Janshakti News

राज ठाकरेंसाठी प्रोटोकॉल बाजूला, नरेंद्र मोदींच्या सभेत स्पेशल ट्रीटमेंट


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ मे २०२४
महायुतीची मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली. महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच अशी महत्त्वाची आणि मोठी सभा पार पडली. या सभेला महत्त्व येण्यामागचं कारण म्हणजे राजकारणात पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आले. राज ठाकरे यांनी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांनी लाव रे तो व्हिडीओ स्टाईलने मोदी सरकारवर त्यावेळी घणाघात केला होता. पण आता राजकीय वातावरण बदललं आहे. हिंदुत्वच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांची महायुतीसोबत मैत्री झाली आहे. त्यामुळे आज राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्रित आलेले बघायला मिळाले.

या सभेत एक महत्त्वाची गोष्ट बघायला मिळाली. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे दिग्गज नेते हजर होते. प्रोटोकॉलनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु होणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. शिवसेना नेते उदय सामंत यांच्यानंतर महायुतीच्या काही प्रमुख नेत्यांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झालं. विशेष म्हणजे अजित पवार यांनी भाषण केलं तेव्हा नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले नव्हते. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं. फडणवीसांचं भाषण पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली तोपर्यंत नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले नव्हते. एकनाथ शिंदे यांचं अर्ध भाषण झाल्यानंतर नरेंद्र मोदी सभास्थळी दाखल झाले. मोदींच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांनी आपलं भाषण पूर्ण केलं.


एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. विशेष म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं भाषण हे मोदींच्या समोर झालं नाही. मोदी सभास्थळी दाखल झालेले नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाला सुरुवात झाली होती. मोदी सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांची सभा पार पडली. त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला सारुन महायुतीने राज ठाकरे यांना स्पेसल ट्रीटमेंट दिली, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.

राज ठाकरे यांच्या मोदींकडे 7 मागण्या

दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर 7 मागण्या ठेवल्या.
“पहिली अपेक्षा… मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. खितपत पडलेला. तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मिळेल ही अपेक्षा करतो. दुसरी अपेक्षा… देशाच्या अभ्यासक्रमात… देशात मराठा साम्राज्य होतं… त्या मराठा साम्राज्याचा इतिहास मुलांना शालेय शिक्षणात द्यावा. देश कसा उभा राहिला हे कळेल. तिसरी गोष्ट… समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभा राहील माहीत नाही. शिवाजींचे गडकिल्ले ही खरी स्मारक आहे. या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक दर्जा प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. पिढ्यांना इतिहास कळावा यासाठी ही समिती असावी”, अशी मागणी राज ठाकरे यानी केली.

“चौथी गोष्ट…. देशभरात अनेक ठिकाणी आपण रस्ते उत्तम बनवले, ब्रीज बनवले. १८ आणि १९ला वर्ष मुंबई-गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यात आहे. तो लवकरात लवकर व्हावा ही विनंती आहे. पाचवी गोष्ट…. तुम्ही तुमच्या सभेत सांगितलं… आज खडसावून सांगा… बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही हे सांगा. तुम्ही लावणार नव्हता. विरोधक जो प्रचार करत आहेत, त्यांची तोंड बंद व्हावीत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“सहावी गोष्ट…. या देशात देशभक्त मुसलमान आहे. त्यांची देशावर निष्ठा आहेत. काही मूठभर आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश त्यांना १० वर्षात डोकंवर काढता आलं नाही. डोकंवर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. मुस्लिम तुमच्यासोबत आहे. त्यांना तुमच्याबद्दल आदर आहे. त्यांना काम करायचे आहे. जे मूठभर आहेत. ओवैसी सारख्या औलादी आहेत. ज्यांचे जे अड्डे आहेत. ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा. तिथे देशाचे सैन्य घुसवा. म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही”, असं राज ठाकरे मोदींसमोर म्हणाले. “सातवी गोष्ट…. रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करता. रेल्वे यंत्रणेंवर बारीक लक्ष द्या. अधिक निधी द्या”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.