| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. १९ मे २०२४
सह्याद्री आणि छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे महाराष्ट्रा लाभलेला शौर्याचा वारसा आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण आणि अथांग समुद्राप्रमाणेच सह्याद्रीचा विस्तार ही तितकाच अफाट आहे. गुजरातच्या सीमेपासून ते दक्षिणेच्या टोकापर्यंत सह्याद्रीच्या पर्वतरांगा विस्तारलेल्या आहेत. परकीय फ्रेंच,डच,पोर्तुगीच आणि मुघल सत्तांशी एक हात लढणारे मराठे जेवढे बेधडक वृत्तीचे होते तेवढाच कणखर हा सह्याद्री ताठ मानेनं ऊन वारा पाऊस झेलत असतो. त्याच्या पराक्रमाच्या गाथा जितक्या चित्तथरारक आहेत तेवढं त्याच्या जन्माची कथा देखील रंजक आहे.
सह्याद्रीतील पर्वतरांगा
भारताच्या पश्चिम सागरी किनाऱ्याला लागून असलेल्या या पर्वरांगाचे क्षेत्रफळ ६०,००० चौरस कि.मी. असून सरासरी उंची १२०० मीटर असल्याचं सांगीतलं जातं. महाराष्ट्रापासून ते दक्षिणेच्या टोकापर्यंत विस्तारलेल्या या पर्वतरांगेत महाराष्ट्रातील कळसूबाई शिखर, साल्हेर , महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड तसंच कर्नाटकात कुद्रेमुख शिखर आणि दक्षिणेकडे केरळमध्ये अनाई मुदी शिखर पश्चिम किनारपट्टी भागातील मुख्य ठिकामं मानली जातात. गुजरातच्या सीमालगत सुरु झालेल्या या पर्वतरांगांनी महाराष्ट्रतील ६५० कि. मी भाग व्यापून घेतला असून गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून भारताच्या दक्षिण टोकापर्यंत याची व्याप्ती आहे.
असा झाला सह्याद्रीचा जन्म
रांगड्या सह्याद्रीचं आकर्षण प्रत्येकालाच असतं. एका ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यांमधून सह्याद्री आणि दख्खनचं पठार निर्माण झालं असं सांगितलं जातं. बेसाल्ट खडक सह्याद्रीत प्रामुख्याने आढळतो. तज्ज्ञांच्या मते अंदाजे 15 कोटी वर्षांपूर्वी सह्याद्री पर्वतरांगास निर्माण झाल्या असाव्यात असं म्हटलं जातं. पृथ्वीवर झालेल्या ज्वालामुखीच्या उत्त्पतीतून याची निर्मिती झाली. या खडकाचं वैशिष्ट्ये म्हणजे हा गडद रंगाचा हा खडक अतिशय खडबडीत आणि कणखर असतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगा बेसाल्ट खडकापासून तयार झाल्या आहेत. याशिवाय सह्याद्रीच्या पर्वतरांगेत चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट हे खडक देखील आढळतात.
मोहवणारं निसर्गसौंदर्य
सह्याद्री जितका राकट आणि दणकट आहे तेवढंच त्याचं सौंदर्य मनाचा ठाव घेतं. समुद्रसपाटीपासून साधारण 900 मी. उंचीवर असलेले पश्चिम घाटातील कोल्हापुरपासून जवळ असलेलं मासाई पठार आणि साताऱ्यातील कास पठार हे कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पावसाळ्यात हिरवा शालू पांघरलेल्या या पठरावरील दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या, रौद्र रुप धारण करणारे धबधबे आणि रंगीबेरंगी रानफुलांचा महोत्सव पाहण्यास पर्यटक कायमच पसंती देतात. या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात विविध प्रकारच्या जैवविविधता आढळते. सह्याद्रीच्या कुशीतून वाहणारी रायगडमधील एकट्या सावित्री नदीत वेगवेगळ्या प्रजातींच्या मगरींचं वास्तव्य आहे. सापाच्या वेगवेगळ्या प्रजाती, जंगली श्वापदं आणि पक्षी हे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या प्रजाती आहेत.
खास ट्रेकिंगरीता जावं अशी ठिकाणं
पावसाळा म्हटलं की अनेकांना वेध लागतात ते ट्रेकींग करण्याचे. पुणे, मुंबई आणि नाशिकवरुन जवळ असलेले किल्ले रायगड, सिंहगड,राजगड, प्रतापगड, वासोटा आणि विसापूर ही ठिकाणं म्हणजे महाराष्ट्रातला स्वर्ग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जर तुम्ही या पावसाळ्यात ट्रेकिंगचा प्लॅन करत असाल आणि पावसाळ्यातील सह्याद्रीचं सौंदर्य हे विलोभनीय सौंदर्य अनुभवायचं असेल तर पश्चिम घाटातील पर्वतरांगांना नक्की भेट द्या. धुक्यात हरवलेला हा सह्याद्री अनुभवणाऱ्या प्रत्येकालाच तो कायमच स्वत:च्या प्रेमात आकंठ बुडालेला भासतो. असा हा मनाला भुलवणारा आणि काळजात धडकी भरवणारा सह्याद्री महाराष्ट्राची आन बाण आणि शान आहे.