Sangli Samachar

The Janshakti News

अन्नाचे ताट बदलले तर पृथ्वीचे आरोग्य सुधारेल : प्रियंका पाटील



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ मे २०२४
पूर्वीच्या काळात अन्न औषधी होते. सध्याचा समाज अन्नाकडे उत्पादन म्हणूनच पाहतो. अन्नाचे आरोग्य बिघडल्यामुळे अनेक समस्यांचा जन्म झाला आहे. अन्नाचे ताट बदलले तर पृथ्वीचे आरोग्य सुधारेल, असे मत पुनरुत्पादक कृषी अभियानाच्या संशोधक प्रियंका पाटील यांनी व्यक्त केले. 

सांगलीतील लठ्ठे एज्युकेशन सोसायटी व अमेरिकेतील दिवाणबहाद्दूर लठ्ठे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत 'पुनरुत्पादक जीवनशैली' या विषयावर प्रियंका पाटील यांनी मार्गदर्शन व प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण केले. त्या म्हणाल्या की, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, बेरोजगारी, भूकबळी अशा सर्व समस्यांचे मूळ अन्न प्रक्रियेत आहे. अनेक आजारांनी जसे माणसांना ग्रासले आहे, तसेच पर्यावरणालाही आजाराने जखडले आहे. आपल्या भोवतालचे हे प्रश्न संपवायचे असतील तर पुनरुत्पादक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. त्यासाठी अन्नप्रक्रिया सुधारली पाहिजे. पूर्वीप्रमाणे अन्न औषधी बनायला हवे.


अन्नाबाबत आपण जागरुक नाही. जगातील उत्पादीत अन्नापैकी ६० टक्के अन्न वाया जाते. दुसरीकडे कोट्यवधी लोक अन्नापासून वंचित असतात. हा विरोधाभास दूर झाला पाहिजे. संशोधन करताना आम्हाला लक्षात आले की जगात सर्वाधिक नकारात्मक परिणाम हे अन्नावर झालेले आहेत. त्यामुळे अन्नप्रक्रियेवरील नकारात्मकता दूर करायला हवी. बियाणांच्या सक्षमीकरणातून त्याची सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी आम्ही बीजमहोत्सवाची परंपरा सुरु केली आहे. पृथ्वीतलावरची जैवविविधता व सेंद्रियता टिकली पाहिजे. याकामी सर्वांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सोसायटीच्या व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष शांतीनाथ कांते, मानद सचिव सुहास पाटील, भरत लठ्ठे, मौसमी चौगुले, उदय पाटील, प्रमोद चौगुले, गजानन माणगावे, डॉ. एस. व्ही. रानडे, सांगलीचे प्रा. एम. एस रजपूत आदी उपस्थित होते.