Sangli Samachar

The Janshakti News

आता शेवटचा टप्पा; पृथ्वीवर माणसांचा अंत आलाय जवळ !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १० मे २०२४
एक दिवस पृथ्वीचा अंत होणार असं म्हटलं जातं. तो कधी आणि कसा याबाबत बरेच दावे केले जातात. पण पृथ्वीवरील जीवनाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पृथ्वीवरील जीवन धोक्यात आलं आहे. पृथ्वीच्या सुरक्षेच्या 7 मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत आता फक्त शेवटचा एक टप्पा उरला आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेला हा अभ्यास जगभरातील 40 हून अधिक शास्त्रज्ञांच्या टीमने केला आहे. संशोधकांच्या मते, मानवाने पृथ्वीला सुरक्षित ठेवणारी प्रत्येक मर्यादा ओलांडली आहे. सध्याची परिस्थिती पाहता शास्त्रज्ञांनी मानवाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की पृथ्वीवर राहणारे प्राणी आणि वनस्पतींसह मानवांचे आरोग्य आणि आपल्या ग्रहाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. आता आपला ग्रह मानवांना राहण्यासाठी योग्य नाही.

सुरक्षिततेच्या सीमा काय आहेत?

शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी आणि आपल्या सुरक्षा सीमांमध्ये हवामान, जैवविविधता, गोडं पाणी, हवा, माती आणि पाणी यांचा समावेश होतो. पृथ्वीवर एकूण 8 नैसर्गिक संरक्षणाचे स्तर आहेत. हा थर मानवाला आणि पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व जीवांना आणि वनस्पतींना केवळ संरक्षणच देत नाही तर त्यांना निरोगी ठेवतो. पृथ्वीवरील जीवन सुरक्षेचे घटक धोकादायक पातळीवर पोहोचले आहेत.


काय होणार परिणाम ?

जर पृथ्वीला सुरक्षितता प्रदान करणारे घटक आणि इथं राहणाऱ्या प्रत्येक जीवसृष्टीला धोका निर्माण झाला, तर आपली आणि आपल्या ग्रहाची काय अवस्था होईल याची कल्पना करणं कठीण नाही. निसर्गाकडून मिळालेल्या सर्व गोष्टी प्रदूषित झाल्या आहेत. हळूहळू माणसांचं जगणं कठीण होत चाललं आहे.

शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की हवामानाने 1-C मर्यादा ओलांडली आहे. बदलत्या हवामानामुळे लाखो लोक आधीच असुरक्षित झाले आहेत. पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्चचे प्रोफेसर जोहान रॉकस्ट्रॉम यांच्या मते, आमच्या आरोग्य चाचण्यांचे निकाल अत्यंत चिंताजनक आहेत.

कसा करायचा बचाव ?

सध्या आपण हवामानाच्या 8 सुरक्षित मर्यादेपैकी शेवटच्या भागात जगत आहोत. त्यामुळे पॅरिस करारातील उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी जगभरातील देशांनी वेगानं एकत्र येऊन काम करणं अत्यंत गरजेचं झालं आहे. UN सदस्य देशांनी 2015 पर्यंत जागतिक तापमानातील वाढ 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवण्याचं मान्य केलं आहे. याशिवाय जगातील 30 टक्के जमीन, समुद्र आणि गोड्या पाण्याच्या क्षेत्रातील जैवविविधतेचे संरक्षण करण्याचंही मान्य करण्यात आले आहे.

पृथ्वी आयोगाच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, सध्याच्या परिस्थितीत आम्ही आमचं निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करू शकत नाही. शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की पृथ्वीवरील प्रत्येक बदलाचं आयोजन करण्याची वेळ आली आहे. संतुलन राखून आपण काही काळ धोका टाळू शकतो.

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की पृथ्वीचा ऱ्हास थांबवायचा असेल तर पृथ्वीवर असलेल्या संसाधनांचा वापर मर्यादित केला पाहिजे. सर्व उपलब्ध संसाधने गरिबांपर्यंत पोहोचतील याचीही खात्री केली पाहिजे. ॲमस्टरडॅम विद्यापीठातील प्राध्यापक आणि अभ्यासाच्या सह-लेखिका जोईता गुप्ता म्हणतात की, ग्रहांच्या सीमेमध्ये सुरक्षित राहण्यासाठी मानवतेसाठी न्यायाची भावना देखील आवश्यक आहे.