Sangli Samachar

The Janshakti News

मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
मुंबईत सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. उन्हामुळे सकाळीच नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कडक उन्हामुळे सर्वच उमेदवारांनी सकाळी लवकर मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले होते. अनेकांना रांगेत उभे असताना उन्हाचा त्रास झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बूथ एजंटचा सोमवारी मतदान केंद्रावरच दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

वरळी मतदारसंघातील मतदान केंद्रांबाहेर प्रत्येक पक्षांनी आपले पोलिंग बूथ उभारले होते. यापैकी डिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या येथे म्हसकर उद्यानात ठाकरे गटाचा पोलिंग बूथ होता. या पोलिंग बूथवर मनोहर नलगे हे पोलिंग एजंट म्हणून काम करत होते. नलगे यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केलं. नलगे यांच्या मृत्यूनंतर ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे.


नलगे यांच्या मृत्यूची माहिती कळताच ठाकरे गटाचे स्थानिक आमदार सुनिल शिंदे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली. "मनोहर नलगे यांचा मृत्यू मतदानकेंद्रावरच झाला होता. सहा वाजायला १० मिनिटं कमी असतात नलगे टॉयलेटमध्ये गेले होते. मात्र ते परतलेच नाहीत. बॅलेट बॉक्स बंद करताना पोलिंग बूथ एजंटची स्वाक्षरी लागते. त्यावेळेस नलगेंचा शोध सुरु केला. मात्र ते टॉयलेटमध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी नलगेंना मृत घोषित केलं," अशी माहिती सुनिल शिंदे यांनी दिली.

दुसरीकडे, आदित्य ठाकरेंनीही अनेक ठिकाणी किमान मूलभूत सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नव्हत्या असा दावा केला होता. यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांनीही मतदानकेंद्रावर पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने या मतदान केंद्रावर हव्या तशा सोयीसुविधा पुरवल्या नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.

आदित्य ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

नलगे यांच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "कडवट शिवसैनिक मनोहर नलगे जी ह्याचं आज मुंबईत पोलिंग बूथवर काम करताना हृदयविकाराचा धक्का येऊन निधन झाल्याचं समजलं. डिलाईड रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० च्या म्हसकर उद्यानातील पुलिंग बूथवर नलगे जी पोलिंग एजन्ट म्हणून काम करत होते. ही बातमी अत्यंत धक्कादायक होती. मनोहर नलगे जीं ना भावपूर्ण श्रद्धांजली!," असे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.