Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभेच्या निकालानंतर उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार, फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
महाविकास आघाडी सरकार कोसळून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र मंत्रीमंडळाचा उर्वरित विस्तार अद्यापही झालेला नाहीय. अशातच महायुतीत अजित पवार गट सामील झाल्याने हा विस्तार आणखी लांबणीवर गेला. अशातच गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 

राज्यात काल लोकसभा निवडणुकीचे सर्व म्हणजे पाच टप्पे पार पडले आहेत. याचा निकाल येत्या ०४ जुन रोजी लागणार. यातच आता लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मंत्रीमंडळाचा उर्वरित विस्तार होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. महायुतीत अजूनही १४ मंत्री पद शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे याठिकाणी आता कुणाची वर्णी लागणार ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, सध्या मंत्रिमंडळात महायुतीचे २७ मंत्री असुन यात भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी १० मंत्री पद असुन अजित पवार गटाकडे सात मंत्रीपदं देण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या विस्तारात आता कुणाच्या वाट्याला किती मंत्रीपदं येणार ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.