Sangli Samachar

The Janshakti News

शिंदेंसोबत गेलो आणि एकटा पडलो : गजानन कीर्तीकर यांची खंत



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो. पत्नीसह दोन्ही मुली आणि अमोल किर्तीकर यांचा या निर्णयाला विरोध होता. परंतु, काही वेगळ्या कारणामुळे हा निर्णय घेतला. मात्र एकनाथ शिंदेंसोबत गेलो, आणि अजित पवारांसारखा एकटा पडलो, असे शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी मनातील खंत व्यक्त केली. कीर्तीकर यांनी पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही खंत बोलून दाखवली. 

एकनाथ शिदेंच्या बंडानंतर सेनेच्या ४० आमदार, १३ खासदारानीं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. वरिष्ठ नेते गजानन किर्तीकर यांचाही समावेश होता. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत मतदान प्रक्रिया पार पडली. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत शिवसेनेच्या (ठाकरे) अमोल किर्तीकर यांच्या विरोधात शिवसेनेचे रविंद्र वायकर रिंगणात आहेत. गजानन कीर्तिकर यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध झाल्याने अखेरच्या क्षणी वायकर यांना उमेदवारी जाहीर केली. सोमवारी (ता.२०) मतदान प्रक्रिया पार पडली. माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. 


कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना यांनी मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, कीर्तीकर यांनी पक्षप्रमुख (ठाकरे) उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाऊ नये, असे अनेकदा बजावले. आम्हाला ते आवडले देखील नाही. त्यामुळे वरिष्ठ नेते असताना एकनाथ शिंदे यांना सलाम ठोकणार का, असा सवाल केला होता. प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार त्यांनी तो घेतला. मात्र मी माझ्या मुलाच्या अमोल किर्तीकर यांच्या पाठीमागे ठाम उभी आहे. तो मोठा मताधिक्याने निवडून येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. 

पत्नीच्या विधानावर गजानन किर्तीकर यांनी स्पष्टीकरण दिले. पत्नी सोबत दोन्ही मुली आणि अमोल यांचा माझ्या निर्णयाला प्रखर विरोध होता. ईडी, खोके किंवा कोणत्याही तपास यंत्रणांना घाबरून शिंदेंसोबत गेलो नाही. त्यामागे एक वेगळ कारण होत. त्यामुळे एकनाथ शिंदें सोबत गेलो. परंतु आता एकटा पडलो, अशी खंत गजानन किर्तीकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. कीर्तीकर यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.