Sangli Samachar

The Janshakti News

फेरतपासणीत ९२ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल, शिवाजी विद्यापीठाबद्दल असंतोष !| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. २२ मे २०२४
गत वर्षात उन्हाळी आणि हिवाळी सत्रात विविध परीक्षा पार पडल्या. यातील ३८ अभ्यासक्रमांच्या एकूण १५ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणांच्या फेरतपासणीकरिता शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजेच १४ हजार ६२६ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कारभाराबाबत रिपब्लिकन स्टुडंटस् युनियनने राज्यपाल तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फेरतपासणीत एकूण अर्जाच्या ९२ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणात बदल (कमी अथवा ज्यादा) होत असेल तर उत्तरपत्रिकेच्या तपासणीच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेतील शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. शासन निर्णय २०१८नुसार सीएचबी (तासिका तत्त्वावरील) शिक्षकांना पेपर तपासणी व यासंबंधित कोणतीही कामे देता येणार नाही, असा स्पष्ट आदेश असताना प्रत्यक्षात याच शिक्षकांना पेपर तपासणी, फेरतपासणीबाबत कामे दिली जातात. हे पेपर तपासणी तसेच शिक्षकांच्या नियुक्तीबाबतची माहिती 'माहिती अधिकार कायद्याखाली' जाणीवपूर्वक देण्यात येत नाही.

पहिल्या परीक्षकाने उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुन्हा दुसऱ्या परीक्षकाकडून तपासणी होते. या दोन्ही परीक्षकांमधील गुणदानात फरक असतो. जर फेरतपासणीत मार्क्स वाढले तर याचा फायदा विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, मार्क्स कमी झाले तर विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाते. हा अन्याय आहे. विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले असल्यास फेरतपासणीच्या आधी दिलेले गुण ग्राह्य धरून त्याचा फायदा देण्याची गरज आहे. काही प्रकरणांत एक-दोन गुणांमुळे विद्यार्थ्यांना नापास केले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.


विद्यार्थ्यांना कोट्यवधीचा भुर्दंड

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २६ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी स्वत:च्या उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीची परीक्षा मंडळाकडे मागणी केली होती.
फोटोकॉपीकरिता १५० रुपये, तर फेरतपासणीसाठी ५०० रुपये प्रति पेपर आकारणी केली जाते. यातून जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागला.

न्यायालयीन आदेशाचा भंग

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार सर्व विषयांची फोटोकॉपी माहिती अधिकार कायद्याखाली २ रुपये प्रति पान यानुसार मागविता येते. तरीही विद्यापीठद्वारे एवढी फी आकारणी का केली जात आहे. विद्यापीठाच्या परीक्षा फीपेक्षाही जास्त खर्च फोटोकॉपी आणि फेरतपासणीसाठी होत आहे. यातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे, अशी टीका वेटम यांनी केली आहे.

कारभाराच्या चौकशीची मागणी

उत्तरपत्रिका तपासणीतील दोषप्रकरणाची सखोल चौकशी व कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे वेटम व सुनील क्यातन यांनी राज्यपाल, मुख्य सचिव, मुख्यमंत्री, यूजीसी, बीसीआय यांच्याकडे केली आहे.