Sangli Samachar

The Janshakti News

"खरंच... येथे न्याय विकला जातो का ?""न्याय देवता आंधळी असते !" असे म्हटले जाते. कथा कादंबरी अथवा चित्रपटातून हे वाक्य आपल्यासमोर वारंवार येत असते. दुसरे एक वाक्य असेच... " न्याय विकला जातो !" या दोन्ही वाक्यांना बळकटी देणारे अनेक प्रसंग आपल्या पाहण्यात, ऐकण्यात येत असतात. वास्तविक 'न्यायदेवता आंधळी असते का ?' 'न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी का असते ?'... तर, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण उभा... अथवा उभी आहे, त्याचा निकालावर परिणाम होऊ नये, न्याय निष्पक्षपणे दिला जावा, म्हणून खरे तर न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी दर्शवण्यात आली आहे. मग एखाद्या प्रकरणातील दोषी व्यक्ती निर्दोष कशी सुटते ? याचे उत्तर शोधायचे झाले, तर नुकतीच पुण्यात घडलेली घटना याची साक्षी देईल.

पुण्याच्या कल्याणी नगर भागात मंद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवणाऱ्या एका बिल्डराच्या पोराने रविवारी दोघांना उडवल्याची घटना घडली होती. हा अपघात इतका भीषण होता की मृत दोघेजण दुरवर फेकले गेले होते आणि रस्त्यावर आपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत गुन्हा दाखल झाल्यानंतर 14 तासांत अल्पवयीन आरोपीला जामीन मिळाला होता. या जामीनावरून आता आश्चर्य व्यक्त होतं आहे. असे असताना आता पुण्याच्या या अपघाताच्या घटनेवर रविंद्र धंगेकर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. धंगेकर यांनी एक्सवर भली मोठी पोस्ट टाकून कारवाईची मागणी केली आहे.

रविंद्र धंगेकर यांनी पैशाव्याल्यांची औलाद अशी मस्ती करणार असेल त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे हे म्हटले आहे. त्यांनी येरवडा पोलिसांवर देखील गंभीर आरोप केले आहेत.

रविंद्र धंगेरकरांची पोस्ट जशीच्या तशी...

कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही.

या घटनेतील दोषी :

1) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल ज्याने मुलाला हीआलिशान गाडी चालविण्यास दिली. या विशाल अग्रवालला कठोर शिक्षा झाली पाहिजे.

2) अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब, Ballr पब या सर्व पब मालकांवर अटकेची कारवाई करून त्यांची पब कायमस्वरूपी बंद केले पाहिजे.

3) येरवडा पोलीस स्टेशनमधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था, ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले. पैशांच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला.या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे.

ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच मृत्यू झालेला आहे. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलला नेले होते. मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हरला ही उभे करण्यात आले. परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी विशाल आग्रवालचा मुलगाच चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाईचा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी ऑफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी मुला विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बऱ्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून , आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स बेलेबल असल्यामुळे वेदांतचा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आणि म्हणूनच या घटनेत दोषी असलेल्या अल्पवयीन आरोपीशिवाय त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना देखील कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी.

न्यायासनावर बसलेली व्यक्ती, समोर आलेले पुरावे आणि साक्षीदार यांनी सादर केलेल्या जबाबानुसार, कायद्यात ज्या तरतुदी आहेत, त्यानुसार शिक्षा देत असते. आणि निकाल देत असताना या कायद्याचा अर्थ ही व्यक्ती कसा गृहीत धरते यावर बराचसा निकाल अवलंबून असतो असे म्हटले जाते.

एक मात्र खरे... हिट अँड रन प्रकरणातील सलमान खान असो किंवा पुण्यातील ताज्या घटनेमध्ये आरोपी विशाल अग्रवाल असो, या धन दांडग्यामुळे "खरंच न्याय विकला जातो का ?" हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.