Sangli Samachar

The Janshakti News

पंढरपुरच्या श्रीविठ्ठल मंदिरात आढळलं "तळघर'; आतमध्ये काय याची लागली उत्सुकता !.| सांगली समाचार वृत्त |
पंढरपूर - दि. ३१ मे २०२४
तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना मंदिरात तळघर आढळले आहे. त्यामध्ये देवाची मुर्ती असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणीसाठी मंदिरात पोहोचले असून याबाबत लवकरच सविस्तर माहिती समोर येईल, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

श्री विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ, कान्होपात्रा मंदिराजवळ फरशी बसवण्याचे काम सुरु आहे. यादरम्यान काम करत असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे आढळले. त्यानंतर सात-आठ फूट खोलीचे हे भुयार असल्याचे सांगण्यात येत आहे. या तळघरात अंधार असल्याने स्पष्ट असे काही दिसत नाही, खोलीत मूर्ती सदृश्य वस्तू दिसते आहे. या तळघरात नेमकं काय आहे हे तळघर केव्हाच आहे, याविषयी तज्ञाकडून माहिती घेतली जात आहे.


मंदिराचे पूर्वापार पूजा अर्चा करणारे बडवे आणि उत्पात, पुजारी मंडळी यांचे कडून माहिती घेतली जात आहे. मुस्लिम आक्रमणा पासून बचाव करण्यासाठी श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती सुरक्षित स्थळी हलविली जात होती. त्यासाठीचे हे तळघर आहे का अशी शंका व्यक्त केली जात आहे.

मंदिराचे सुशोभीकरणाचे काम सुरु

पंढरपूरचा श्री विठ्ठल हे देशातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी अशा चार प्रमुख वाऱ्या आहेत. यावेळी लाखो भाविक पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. आषाढी वारीला 10 लाखावर भाविक वारकरी येतात. यावर्षी येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. दरम्यान, पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या संवर्धन तसेच सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन, संवर्धन व्हावे यासाठी 73 कोटी रुपयांच्या आराखड्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत नवे बांधकाम हटवून जुने रुप समोर आणले जात आहे. यादरम्यान हे तळघर आढळले आहे.

मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे 700 वर्षापूर्वीचे मुळ रुप समोर आल्यानंतर आता मंदिरातील नऊ दरवाजे चांदीने चकाकणार आहेत. यासाठी सुमारे 800 ते 900 किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. श्री विठ्ठल गर्भगृहाच्या मुख्य दरवाजा बरोबरच चौखांबी आणि सोळखांबी मंडपातील आठ दरवाजांवर चांदीचे नक्षीकाम केले जाणार आहे. या बरोबरच मंदिरातील गरुड खांब, मेघडंबरी देखील चांदीने मडवला जाणार आहे.