Sangli Samachar

The Janshakti News

जेवायला बोलावले अन् झाला घात; जुन्या देण्याघेण्यावरून केला खून !| सांगली समाचार वृत्त |
शिराळा - दि. ३१ मे २०२४
चिखली (ता.शिराळा) येथे जुन्या पैशाच्या देणे घेणेच्या कारणावरुन झालेल्या मारहाणीत जखमी अमृत दत्तात्रय देसाई (रा. भाटशिरगाव) यांचा उपचारादरम्यान कराड येथील रुग्णालयात बुधवारी (दि.२९) मृत्यू झाला असून संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड (रा.चिखली) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सुनिल बाबासाहेब देसाई व त्याचा चुलत भाऊ अमृत दत्तात्रय देसाई हे संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड यांचे घरी जेवायला गेले होते. यावेळी जुन्या पैशाच्या देणे घेणेच्या कारणावरुन वाद झाला. संशयित आरोपी सुहास गायकवाड याने तेथील ठेवलेल्या खो-याने सुनील देसाई यांच्या डोक्यात व अमृत देसाई यास डावे कानावर मारुन मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.

याबाबत ६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दि.७ रोजी सुहास गायकवाड यास अटक केली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता दि. ०८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयातून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.

जखमी अमृत देसाई यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना बुधवारी दि.२९ मे रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर भाटशिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अमृत देसाई यांच्या पश्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.