Sangli Samachar

The Janshakti News

जितेंद्र आव्हाडांनी 'मनुस्मृती' जाळली, पण 'ठिणग्या' पडल्या अजित पवार गटात; आता हसन मुश्रीफ छगन भुजबळांवर भडकले !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३१ मे २०२४
शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याच्या आंदोलनामध्ये अनावधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोस्टर फाडल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. हा मुद्दा भाजपने राज्यपातळीवर नेल्यानंतर आता त्यांच्यावर टीका होत आहे. असे असतानाच आता अजित पवार गटामध्ये सुद्धा वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत. अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ छगन भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केल्याने भडकले आहेत. त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले, ते अतिशय दुर्दैवी

जितेंद्र आव्हाड पोस्टर वादावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, आव्हाड यांनी म्हणून मनुस्मृती पोस्टरवर आंबेडकरांची प्रतिमा असलेल्या पोस्टर फाडणं हे निंदनीय तर आहेच. मात्र, आमचे नेते छगन भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचे वक्तव्य केले, ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना या संदर्भात खडे बोल सुनावले पाहिजे होते. ती कृती अत्यंत चुकीची आहे, याबाबत आपण बोललं पाहिजे होतं, असं मुश्रीफ यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा होत असतानाच मनुस्मृतीवरून अजित पवार गटामध्ये वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत.


राज्यसभेला पाठवण्यासंदर्भात मला कोणतीही माहिती नाही

दरम्यान, भुजबळ यांच्या राज्यसभेची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले की, छगन भुजबळ यांना राज्यसभेत पाठवण्यासंदर्भात मला कोणतीही माहिती नाही. या संदर्भात आमचे नेते अजितदादा पवार सांगू शकतील.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे कौटुंबिक कारणास्तव परदेश दौऱ्यावर आहेत. ते लवकरात लवकर येऊन आपल्या सेवेमध्ये रुजू होतील असेही त्यांनी सांगितले. राज्यावर दुष्काळाचा सावट असल्याने निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये दुष्काळ संदर्भात काम करण्यासाठी सूट दिली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन बैठक घ्यावी लागली. निवडणूक आयोगाने दुष्काळाच्या कामासाठी सूट दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.

विधानसभेच्या जागा वाटपावरून सुद्धा छगन यांनी वक्तव्य करून महायुतीमध्ये वादाची ठिणगी टाकली होती. या संदर्भात बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले की विधानसभा निवडणुकीत जागावाटपासंदर्भात भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र, या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी खुलासा सुद्धा केला आहे. लोकसभेला ज्या पद्धतीने आम्हाला कमी जागा मिळाल्या, त्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये यासाठी आत्ताच आपल्या नेते मंडळींना जागांसाठी प्रयत्न करा, असं सूचित केलं असल्याचे त्यांनी सांगितले.