| सांगली समाचार वृत्त |
बिकानेर - दि. ५ मे २०२४
संपूर्ण जगभरात अशी अनेक ठिकाण, वस्तू वा वास्तू आहेत ज्यांची रहस्य उलघडणे खरोखरच मोठे आव्हान आहे. तंत्रज्ञान विकसित होऊनही अनेक गोष्टींची उत्तरे विज्ञानाला देखील सापडत नाहीत. तर अनेकदा काही घटना अशा असतात ज्या क्षणात अचंबित करून टाकतात. अशाच एका घटनेविषयी आज आपण माहिती घेत आहोत. आपण ज्या घटनेविषयी बोलत आहोत ती घटना गेल्या महिन्यात राजस्थानमधील बिकानेरजवळील लुंकरनसार येथे घडली. याविषयी शास्त्रज्ञांनी सखोल अभ्यास करून रिपोर्ट सादर केला आहे. चला तर ही घटना नेमकी काय आहे ? आणि ती का घडली ?
काय घडलं ?
त्याच झालं असं की, एके दिवशी एका शेतकऱ्याला आपल्या शेतात जाताना रस्त्याच्या कडेला एक लहानसा खड्डा दिसला. हा खड्डा थोडा थोडा करून मध्यरात्रीपर्यंत आणखीच रुंद होत गेला आणि काही वेळातच हा छोटा दिसणारा खड्डा ७० फूट खोल इतका मोठा झाला. या खड्ड्याच्या आजूबाजूची सगळी झाडे आणि जवळून जाणारा रस्तादेखील या खड्ड्यात खचून गेला. ही घटना अत्यंत रहस्यमयी प्रकारे घडल्याने सगळीकडे चर्चेचा विषयी ठरली. नशीब त्यावेळी रस्त्यावर कोणते वाहन नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
भूस्खलनाचे कारण काय ?
या घटनेची इतकी चर्चा झाली की, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) च्या शास्त्रज्ञांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लुंकरनसरला जावे लागले. या घटनेचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ६ दिवस संशोधन केले. अखेर ३० एप्रिल रोजी त्यांनी या घटनेचे कारण स्पष्ट केले. बिकानेरमध्ये अचानक झालेल्या भूस्खलनाचे मुख्य कारण पाणी असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले शास्त्रज्ञ ?
शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतर त्यांनी रिपोर्टमध्ये जमीन कमी होण्याच्या प्राथमिक कारणांबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले, 'जमीन कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पाण्याचा नैसर्गिक स्रोत. जिथे खड्डा पडला त्या ठिकाणी पूर्वी पाण्याचा मोठा स्रोत होता. जो काही कारणाने आटल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. पाणी कोरडे पडल्याने वा संपल्याने इथे पोकळी निर्माण झाली आणि अचानक जमीन आतमध्ये बुडू लागल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.
भूगर्भातील पाणी संपण्याचे कारण..
विविध स्रोतांमधून अनियंत्रित पद्धतीने जमिनीतून पाणी काढण्यात आल्याने ही घटना घडली, असे भूवैज्ञानिकांचे मत आहे. तसेच जलसंचय यंत्रणा आणि भूजल पुनर्भरणाची योग्य व्यवस्था नसल्यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत संपुष्टात येत आहेत. शिवाय कमी पावसामुळेदेखील भूजल पातळी खालावते. अद्याप, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नसले तरी जीएसआयच्या शास्त्रज्ञांनी सादर केलेल्या अहवालात बुडालेल्या जमिनीजवळचा रस्ता पुन्हा बांधू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दैवी किंवा नैसर्गिक हल्ला
या भागात राहणाऱ्या अनेकांनी विविध मत प्रकट केली आहेत. स्थानिक लोकांबद्दल सांगायचं तर, त्यांनी या भूस्खलनाचे कारण नैसर्गिक जलस्रोत असल्याचे मानण्यास नकार दिला आहे. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार हा दैवी किंवा नैसर्गिक हल्ला असल्याचे बोलले जात आहे. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार, खूप वर्षांपूर्वी इथे वीज पडली होती आणि त्यामुळे हे मोठे खड्डे तयार झाले होते. आता वरील माती जाऊन तिथे पुन्हा खड्डे झाल्याचे म्हटले जात आहे.