| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ४ मे २०२४
संजयकाकांनी दहा वर्षे खासदारकी भोगली. खांद्यावर हात टाकून जनतेचा खिसा कापला. राजा, राजा म्हणत जनतेचा बाजा वाजविला, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी केली. सांगलीच्या खासदार कसा असावा, हे संसदेत दाखवून देईल, असा विश्वासही जनतेला दिला. पलूस तालुक्यातील सावंतपूर, नागराळे, बुर्ली, घोगाव, दह्यारी, तुपारी, पुणदी, बाबंबडे, पलूस आदि ठिकाणी अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा, सभा घेण्यात आल्या. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सुहास पुदाले, पांडुरंग सुर्यवंशी, शरद शिंदे पाटील, गिरीष गोंदील, ऋषिकेश जाधव, पलूस बँकेचे चेअरमन वैभव पुदाले, उदयसिंह देशमुख, विश्वास येसुगडे, मार्केट कमिटीचे सभापती संजय पवार आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले की, प्रत्येक गावात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या सरकारला शेतकरी, तरुण, व्यापारी, महिला कंटाळले आहेत. ईडी, सीबीआयच्या दहशतीखाली असल्याने जनता, नेते भाजपविरोधात बोलत नव्हते. मतदानातून भाजपाविरोधात राग काढण्याचा निर्धार जनतेने केले आहे. असे विशाल पाटील म्हणाले.
सेटलमेंट करून निवडणुक जिंकण्याचा भाजपचा डाव होता. कदम-दादा घराण्यात काही वर्षापूर्वी वाद होता. आता आम्ही शरीर, मनाने एकत्र आलो. पण आमच्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले. असे सांगून विशाल पाटील म्हणाले, मन एक झाले पण शरीर एक येण्यास अडचण झाली. आम्ही एकत्र सभेला जावे अशी इच्छा होती. सांगली जिल्ह्याचे नेतृत्व राज्यावर राज्य करेल, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची गादी सांगलीला मिळेल, या भीतीने काहींना खोडा घातला. विश्वजित कदम हे महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची सक्षमता आहे. संस्था चांगली चालवितात. निधी खेचून आणतात. त्यांच्या साथीला बसंतदादा विचारांची लोक आले तर काँग्रेसची ताकद वाढेल. पण हे कुणाला तरी आवडले नाही. जनतेच्या आग्रहामुळे उमेदवारी अर्ज भरला. विश्वजित कदम यांच्यावर दबाव आणला गेला. मलाही आमिषे दाखविली. पण माझे बंड स्वार्थासाठी नव्हते. लोकांच्या इच्छेखातर मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे जनतेशी मी बेईनामी करू शकणार नाही.
यावेळी बोलताना विशाल पाटील पुढे म्हणाले की, काँग्रेस उभी करण्यासाठी वसंतदादा, पतंगराव कदम यांनी कष्ट घेतले. त्या पक्षावर अन्याय होत आहे. सात दिवसांपूर्वी आलेल्या पैलवानाला उमेदवारी दिली. संजय राऊत दोन महिने माझ्यावर बोलत आहेत. माझ्यावर भाजपचा बी टीम असल्याचा आरोप ते करतात. त्या आरोपावर लोक हसत आहेत. महाआघाडी महायुतीचे उमेदवार एकमेकांवर बोलत नाही. माझ्यावर टीकाटिप्पणी करीत आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. जनताच तुम्हाला घरी बसविणार आहे, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला.
उत्तरप्रदेशाचे लोक सांगलीत रोजगारासाठी येत आहेत. त्यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगलीत येऊन खासदार कोण असावा, हे सांगत आहेत. संजयकाकांच्या प्रचाराला मोदी, शहा, गडकरी येणार आहेत. कुणीही प्रचाराला आणले तरी तुमची डाळ शिजणार नाही. संजयकाकांनी दहा वर्ष खासदारकी भोगली. खांद्यावर हात टाकून जनतेचा खिसा कापला. राजा म्हणत जनतेचा बाजा वाजविला.. सांगलीच्या खासदार कसा असावा, हे संसदेत दाखवून देईल. शेतकरी, मराठा धनगर आरक्षणाचे प्रश्नांवर संजयकाकाच कधी बोलले नाही. केवळ जमिनी लाटण्याचा उद्योग केला. देवळाच्या जमिनी लाटणा-या खासदाराला आता हिंदूत्वाची आठवण होत आहे. साखर कारखान्याचे सभासद हिंदूच आहेत. त्या हिंदूंनाच लुटण्याचे काम केले. महापुरात खासदार संजयकाका मदतीला आले नाही. आम्ही चारा पुरविल्या, अन्नधान्य दिले. मी ज्या विमानात बसलो आहे, त्या विमानाचा पायलट चांगला भेटला आहे. महाआघाडीने पायलटला विमानातून उतरून घेतले आहे. पण तो पायलट खाली बसून रिमोट कंट्रोलने विमान दिल्ली पोहोचवेल, असे विशालदादा पाटील म्हणाले.