Sangli Samachar

The Janshakti News

प्रचाराची धुरा सौभाग्यवतींच्या हाती; खानापुरात ज्‍योती पाटील, पूजा पाटील, दिव्‍या पाटील प्रचारात| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. १ मे २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे.‌ देश, राज्यपातळीवर नेते प्रचारासाठी येत आहेत. खानापूर तालुका त्यास अपवाद नाही. सर्व उमेदवार मतदारसंघात प्रचारासाठी व्यस्त आहेत. खानापूर तालुक्याची जबाबदारी उमेदवारांनी आपल्या सौभाग्यवतींच्या हाती सोपवली आहे. सौभाग्यवतींनी आपल्या पतीच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. 

महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील या भाळवणी, लेंगरे, पारे, खानापूर महिला मेळावे घेऊन संजय पाटील यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत.‌ त्यांच्यासमवेत विट्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा पाटील होत्या. सुहास बाबर यांच्या पत्नी प्रा. सोनिया यांनी लेंगरे परिसरात महिलांच्या बैठका घेतल्या आहेत. माजी सभापती मनीषा बागल‌ उपस्थित होत्या. 

अपक्ष उमेदवार विशाल पाटील  यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी खानापूर घाटमाथ्यावरील गावांमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधत आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशाल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत. महिलांचे प्रश्न समजून घेत आहेत. महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील  यांची पत्नी दिव्या पाटील याही महिलांशी संवाद साधत आहेत. पती चंद्रहार यांनी कुस्ती क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती देत सामाजिक क्षेत्रात केलेल्या सार्वजनिक कामांची‌ आठवण करून देत आहेत. बहीण प्राजक्ता पाटील या भाऊ चंद्रहार यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत.