| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ मे २०२४
बालस्वास्थ्य कार्यक्रमात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. याच गतीने आरोग्य विभागाने कामे करावीत. शासकीय रुग्णालयांत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. जिल्हा परिषदेत सोमवारी एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण समितीच्या नियामक मंडळाच्या सभेत त्या बोलत होत्या.
धोडमिसे म्हणाल्या, स्मार्ट पीएचसीच्या माध्यमातून माता व बालकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात २०२३-२४ या वर्षात २६१ बालकांच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ४२५० अन्य शस्त्रक्रिया झाल्या. यामुळे जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर आला. तंबाखूमुक्त कार्यक्रमांतर्गत सर्व शैक्षणिक संस्था व आरोग्य संस्था तंबाखूमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य आहे. किशोरवयीन मुले व मुलींच्या शारीरिक व मानसिक समुपदेशनासाठी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात मैत्री क्लिनिक सुरू केली आहेत. महाविद्यालयांमध्येही पौगंडावस्थेतील प्रश्नांचे व समस्यांचे समुपदेशकाद्वारे निराकरण करावे.
आरोग्याधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी सांगितले की, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून तीन महिन्यांत १० हजार २० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कर्करोगाच्या सर्वाधिक म्हणजे ७९८५१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लोकसंख्येनुसार सांगली जिल्हा महात्मा फुले योजनेत प्रथम क्रमांकावर आहे. स्मार्ट पीएचसी हा उपक्रम राज्यभरात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदलासाठी व्हिजन सांगली उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ. शिवाजी आलदार, आदी उपस्थित होते.
आरोग्य केंद्रांना पारितोषिके देणार
धोडमिसे यांनी सांगितले की, आरोग्य उपक्रमांच्या १११ कार्यक्रम निर्देशांकात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
इस्लामपूर रुग्णालयाचे अभिनंदन
इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाने कायाकल्प कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला.