Sangli Samachar

The Janshakti News

50-30-20 चा नियम आहे तरी काय? पगार संपणार नाही, सेव्हिंगही होणार भरपूर !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ मे २०२४
नोकरदार वर्गाची पगार ही एक मोठी समस्या असते. नोकरदार महिनाभर पुढच्या पगाराची वाट पाहात असतात. विशेष म्हणजे पगार झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसांत तो कोठे जातो, हे अनेकांना समजतही नाही. हातात पैसे शिल्लक न राहिल्यामुळे हेच पगारदार पैशांची गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यामुळेच आलेल्या पगाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे. हाताशी काहीतरी पैसे ठेवून ते म्यूच्यूअल फंड, शेअर बाजार यामध्ये गुंतवणे गरजेचे आहे. मात्र अनेक लोकांना हे प्रत्यक्ष शक्य होत नाही. याच पार्श्वभूमीवर खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी 50-30-20 चा नियम तुम्हाला फार मदत करू शकतो. हा नियम काय आहे? हे जाणून घेऊ या...

50-30-20 नियम काय आहे ?

50-30-20 हा नियम सर्वप्रथम अमेरिकी सीनेट तसेच टाईम मॅगझीनमध्ये प्रभावशाली 100 लोकांमध्ये स्थान मिळवणाऱ्या एलिझाबेथ वॉरेन यांनी आणला होता. याच नियमाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलीला सोबत घेऊन 2006 साली All Your Worth: The Ultimate Lifetime Money Plan नावाचे एक पुस्तक लिहिले होते. या 50-30-20 नियमाअंतर्गत त्यांनी त्यांच्या पगाराचे तीन भाग केले होते. आवश्यकता, इच्छा आणि बचत असे हे तीन भाग होते. एलिझाबेथ वॉरेन यांच्या मतानुसार पगारातील 50 टक्के हिस्सा हा गरजेच्या वस्तूंवर खर्च केला पाहिजे. त्या वस्तूंशिवाय आपण जगूच शकत नाही, अशा वस्तूंवर हा 50 टक्के हिस्सा खर्च करावा, असे वॉरेन यांचे मत आहे. यामध्ये घरातील रेशन, घरभाडे, यूटिलिटी बिल, मुलांचे शिक्षण, ईएमआय, आरोग्य विमा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 


30 टक्के रक्कम कोठे खर्च करावी ?

त्यानंतर 50-30-20 या नियमाच्या दुसऱ्या भागात 30 टक्के खर्चाच्या नियोजनाबद्दल सांगितलेले आहे. पगारातील 30 टक्के खर्च हा तुमची इच्छा असणाऱ्या गोष्टींवर खर्च केला पाहिजे. या अशा गोष्टी आहेत, ज्यांना तुम्ही टाळू शकता, पण त्या गोष्टींसाठी पैसे खर्च केल्यावर आनंद मिळतो. यामध्ये चित्रपट पाहणे, पार्लर, शॉपिंग, बाहेर जेवायला जाणे अशा गोष्टी या 30 टक्के खर्चात येतात. 

20 टक्के रक्कम सेव्हिंगसाठी ठेवून द्यावी

50-30-20 या नियमात शेवटचा भाग आहे तो 20 टक्के खर्चाचे नियोजन कसे करावे. एलिझाबेथ यांच्या मतानुसार पगारातील 20 टक्के भाग हा सेव्हिंगसाठी ठेवून द्यायला हवा. या पैशांचा उपयोग, निवृत्तीनंतरचे नियोजन, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, एमर्जन्सी फंड यासाठी राखून ठेवला पाहिजे. 

उदाहरणासह समजून घ्या नियम 

समजा तुमचा महिन्याला येणारा पगार हा 50 हजार आहे. यातील साधारण 50 टक्के भाग 25 हजार रुपये हे रेशन, वीजबील, पाणीबील, मुलांची फी, पेट्रोल अशा अत्याशक्यक, न टाळता येणाऱ्या गोष्टींवर खर्च करावेत. त्यानंतर 30 टक्के पैसे म्हणजेच 15 हजार रुपये हे फिरायला जाणे, चित्रपट पाहणे, शॉपिंग करणे, मोबाईल, टीव्ही खरेदी करणे अशा आवडीच्या, इच्छा असणाऱ्या कमांसाठी खर्च करता येतील. उर्वरीत 20 टक्के म्हणजेच 10 हजार रुपये हे गुंतवणुकीसाी जपून ठेवले पाहिजेत. यामध्ये एफडी, निवृत्तीसाठी एनपीएस, पीपीएफ, म्यूच्यूअल फंड, एसआयपी यामध्ये हे पैसे गुंतवावेत.