Sangli Samachar

The Janshakti News

प्रेक्षकदेखील कलाकारांचे गुरू अशोक सराफ !| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १२ मे २०२४
नाट्य किंवा चित्रपट क्षेत्रात अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाकडून काहीतरी घेण्यासारखे असते. अजूनही मी विद्यार्थी आहे. मी करतोय हे लोकांना आवडत आहे. तरीदेखील मी पूर्णत्वाला गेलो, असे मी म्हणू शकत नाही. यापुढेही मी बरेच काहीतरी करू शकतो, असे मला वाटते. राजदत्त यांच्याकडून आम्ही नकळत शिकून गेलो. प्रत्येक माणसात वेगळा गुण असतो, त्या न्यायाने प्रेक्षकदेखील कलाकारांचे गुरू असतात, असे मत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गुरुमाहात्म्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. ट्रस्टतर्फे अशोक सराफ, प्रल्हाद पै, डॉ. कैलास काटकर यांना गुरुमाहात्म्य पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सिने दिग्दर्शक राजदत्त, विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर, संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर उपस्थित होते.


राजदत्त म्हणाले, ''प्रत्येकाच्या जीवनात दुःखं असतात. मात्र, त्याला तोंड देत त्यावर मात करत जीवन जगता आले पाहिजे. नैराश्य आणि दुःखाने माणूस अस्वस्थ होतो. तरीही आनंदात जगण्यासाठी माणसाला कष्ट करावे लागतात. आजच्या भोगवादी जीवनात चांगले विचार समाजात रुजविण्याचे कार्य दत्तमंदिर ट्रस्टकडून सुरू आहे.''

शंकर अभ्यंकर म्हणाले, ''विज्ञानाने प्रगती केली असली, तरी देखील मानवी जीवनाला दिशा देईल, असे वाटत नाही. विज्ञान तटस्थ आहे, मानवाने त्याचा उपयोग कसा करावा, यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे.'' डिजिटल इंडियाच्या काळात सायबर संस्कार होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. शिकारपूर यांनी व्यक्त केले.

प्रल्हाद पै म्हणाले, ''प्रत्येक क्षेत्रात आपल्याला गुरू आवश्यक असतात. अध्यात्मातही सद्‍गुरूंची गरज असते. सद्‍गुरू हा निरपेक्ष असला पाहिजे. तसेच ते आत्मज्ञानी असले पाहिजेत. शहाणपण व ज्ञान घेणे आवश्यक आहे.'' अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी स्वागत केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार यांनी आभार मानले.