Sangli Samachar

The Janshakti News

वीज ग्राहकांवर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा भार; अतिरिक्त रक्कम पाहून ग्राहक अवाक !| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ मे २०२४
महाराष्ट्रात विजेसाठी सर्वाधिक दर आहे. त्यात महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरवाढ लागू केली. शिवाय आता वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचेही देयक ग्राहकांना दिले जात आहे. महावितरणने एकाच महिन्यात वीज ग्राहकांना दिलेला हा दुहेरी ''शॉक'' आहे. 

तालुक्याचे तापमान ४३ अंशांवर गेले आहे. आणखी ऊन्ह तापणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. दिवसा तीव्र उन्ह आणि रात्री उकाड्यापासून बचावासाठी रात्रभर कुलरही सुरू ठेवावा लागत आहे. 

यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली असून बिलाची रक्कमही वाढली आहे. या बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचेही देयक देण्यात आल्याने ग्राहकांत संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने गतवर्षी द्विवार्षिक वीज दरवाढीला मंजूरी दिली होती. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे एप्रिलपासून लागू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर ६ ते ८ टक्के अधिकचा भार पडणार आहे.


उन्हाळ्यात अधिक विजेच्या वापरामुळे भरमसाठ बिलासाठी तयार राहावे लागणार आहे. त्यात अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे देयक एप्रिलमध्येच मिळाल्याने ग्राहकांचा पारा चांगलाच चढला आहे. आयोगाची विद्युत पुरवठा संहितेनुसार वीज ग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारली जाते. नवीन नियमांनुसार एप्रिलमध्ये ती दुप्पट करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होईल.

सुरक्षा ठेवीची गरजच काय ?

अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारण्याचा महावितरणला अधिकार आहे. पण आता राज्यभरात 'प्रीपेड मीटर' लावले जाणार आहे. त्यासाठी निविदासुद्धा काढण्यात आली आहे. प्रक्रिया गतीने पुढे जात आहे. हे मीटर लागताच ग्राहकांना पूर्वीच पैसे मोजून नंतर तेवढ्या रकमेची वीज वापरता येणार आहे. अशात अतिरिक्त सुरक्षा ठेवींची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महावितरणकडून 'प्रीपेड मीटर' लावत असताना अतिरिक्त ठेवींची सक्ती करू नये. तसेच मीटर लागताच जमा झालेली राशीही ग्राहकांना परत करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.